डांगसौंदाणे – बागलाण तालुक्याच्या सीमावर्ती भागातून बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गुजरात राज्यातून विविध वाहनातून मोठ्या प्रमाणावर गो तस्करी चालते. तस्कर हे गोवंश हत्येसाठी मालेगाव येथे वाहतूक करतात २० जुलै रोजी पहाटेच्या सुमारास चाळीसगाव- काठरा महामार्गावर सीमावर्ती भागातून मालेगाव कडे वाहतूक करताना करंजखेड गावाशेजारी सागचा माळ परिसरात तीव्र वळणाचा रात्रीच्या अंधारात चालकाला अंदाज न आल्याने पीक- अप क्रमांक एम एच ४१ जी २३६२ हे वाहन अपघात ग्रस्त होऊन नालीत जाऊं कोसळले. अक्षरशा कोंबून कोंबून भरलेल्या नऊ गोवंशजांपैकी अपघातात दोन गाईंचा जागीच मृत्यू झाला असून उर्वरित सातही जखमी झाले आहेत .खोल नाल्यातून वाहन निघणार नसल्याचे लक्षात आल्याने चालक व इतरांनी रात्रीच पोबारा केला.
सकाळी वरील घटनेची माहिती करंजखेडचे सरपंच संजय चौरे व पोलीस पाटील पंडित महाले यांनी सटाणा पोलीस स्टेशनला कळवली. माहिती मिळताच पोलीस हवा. प्रकाश जाधव ,पो.ना जयंतसिंग सोलंकी, पंकज सोनवणे ,सागर बेलुस्कर यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत गावकऱ्यांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन नालीतून बाहेर काढले व जखमी गोवंशजांची सुटका केली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी त्यांच्या समवेत पशुसंवर्धन विभागाचे वैद्यकीय अधिकारी ए. ए. खान होते. त्यांनीही सातही जखमी गोवंश जनारावर प्रथमोपचार केले. तर मृत झालेल्या दोघांचे शवविच्छेदन करून जेसीबीच्या साह्याने खड्डा करुन पुरुन देण्यात आले. उर्वरित सातही गोवंशजांची रवानगी पांजरापोळ संस्थेत करण्यात आली. यावेळी अपघात तथा अवैध गोवंशज वाहतूक कायद्याअंतर्गत सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शनात सहा.पोलीस निरीक्षक गवई व पोलीस हवा प्रकाश जाधव करीत आहेत. यावेळी परिसरातील मनोहर सोनवणे, अण्णा बैरागी, भिला शिवदे, महादू महाले, तुकाराम चौरे ,तुकाराम देशमुख, शिवाजी महाले यांचेसह नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले.