बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली माहिती
सटाणा : नाशिक जिल्ह्यातील प्रामाणिकपणे नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना जिल्हा बँकेतर्फे तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भूजबळ यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे यांना दिले आहेत, अशी माहिती बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी आज रविवार (ता.१८) रोजी येथे दिली. बँकेच्या आडमुठे धोरणामुळे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी नवीन पीककर्जापासून वंचित असल्याने सौ.दीपिका चव्हाण यांनी पालकमंत्री भूजबळ यांच्यासह राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देऊन याप्रश्नी शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याची आग्रही मागणी केली होती.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ता.१ एप्रिल पासून शेतकर्यांना कर्ज वाटप करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असतांनाही शेतकर्यांनी ता.३१ मार्च २०२१ पूर्वी प्रामाणिकपणे विविध कार्यकारी संस्थांकडे कर्जाचा भरणा केला. मात्र जिल्हा बँकेने अनिष्ट तफावत असलेल्या संस्थांना कर्जपुरवठा करण्यास नकार दिल्याने प्रामाणिकपणे नियमित कर्जफेड करणारे सर्वसामान्य शेतकरी पीककर्जापासून वंचित होते. त्यामुळे शेतकर्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले होते. शासनाने या बाबीची गांभीर्याने दखल घेत जिल्ह्यातील शेतकर्यांना तातडीने कर्ज वाटप करून दिलासा देण्याची आग्रही मागणीही सौ.चव्हाण यांनी पालकमंत्री भूजबळ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांच्याकडे केली होती.
दरम्यान, पालकमंत्री भूजबळ यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पिंगळे यांना तत्काळ कर्जवाटपाचे आदेश दिले. राज्य शासनाच्या सहकार व नाबार्ड विभागाने जिल्हा बँकेच्या कर्जवाटपावर निर्बंध लावले होते. सहकार विभागाने आपल्या ऑडिटमध्ये बँकेवर तसे ताशेरेही ओढले होते. त्यामुळे बँकेवर प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासकांनी अनिष्ट तफावतींमध्ये असलेल्या विविध कार्यकारी संस्थांना कर्जवाटप करू नये असे धोरण अवलंबविले होते. पालकमंत्र्यांच्या आदेशामुळे आता जिल्ह्यातील ज्या विविध कार्यकारी संस्था अनिष्ट तफावतीमध्ये नाहीत, अशा संस्थांच्या माध्यमातून शेतकर्यांना कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिंगळे यांनी माजी आमदार सौ.चव्हाण यांना दूरध्वनीवरून दिली. जिल्हा बँक सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडली असून बँकेच्या सभासद व शेतकर्यांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचेही श्री.पिंगळे यांनी सांगितले.
तत्काळ कर्ज उपलब्ध होईल