सटाणा – समको बँकेत निवडणुकीत सत्ताधारी रमेश देवरे व श्रीधर कोठावदे यांच्या नेतृत्वाखालील आदर्श पॅनलने दणदणीत विजय मिळवला असून पॅनलचे १५ तर श्री सिद्धिविनायक पॅनलचे फक्त दोन उमेदवार निवडून आले आहेत. निवडणूक अत्यंत चुरशीची होईल अशी चर्चा सभासदांमध्ये असली तरी आदर्श पॅनलने या निवडणुकीत एकतर्फी विजय प्राप्त केला आहे. ही निवडणूक सात वर्षांनी झाली. श्री सिद्धिविनायक पॅनेलने सत्तारूढ गटाला जोरदार आव्हान दिले होते. गेल्या सात वर्षात अनेक तक्रार अर्ज सहकार खात्याकडे करून बँकेचे कामकाज वेठीस धरले होते. पण, निवडणुकीत सभासद आदर्श पॅनलच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिले. क्रॉस वोटिंगमुळे अनेक मतपत्रिका अवैध ठरल्या असून आदर्श पॅनलच्या एका उमेदवाराला २४ पैकी फक्त त्यालाच ११ मतपत्रिकांवर मत दिल्याचे आढळून आले तर श्री सिद्धिविनायक पॅनलच्या नेत्यास शिव्यांची लाखोली वाहिलेली चिठ्ठी आढळून आली.
या निवडणूक निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. १९ जून रोजी मतदान झाल्यानंतर २० जून रोजी मतमोजणीवर श्री सिद्धिविनायक पॅनलने आक्षेप घेतल्याने मतमोजणी थांबवून बूथ क्रमांक ४/२ ची निवडणूक झाली. आज निकाल जाहीर झाल्याबरोबर आदर्श पॅनेलच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत व फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोष केला. निवडून आलेले आदर्श पॅनलचे उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे –
सर्वसाधारण गट
पंकज ततार (३६७८), जयवंत येवला (३५०२), कैलास येवला (३३८०), स्वप्नील बागड (३२९८), सचिन कोठावदे (३१२१), महेश देवरे (३०५५), अभिजीत सोनवणे (२९४८), चंद्रकांत सोनवणे (२९१७),रमणलाल छाजेड (२८८१), प्रवीण बागड (२८५८), सिद्धिविनायक पॅनल – विठ्ठल येवलकर (३२८७), भास्कर अमृतकर (२८५५)
भटक्या विमुक्त जाती जमाती गट- जगदीश मुंडावरे
इतर मागास वर्ग गट- दिलीप येवला (३३९१)
अनुसूचित जाती-जमाती गट – प्रकाश सोनग्रा
महिला राखीव – रूपाली कोठावदे (३३४७), कल्पना येवला (३१५८)
मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून देवळ्याचे सहाय्यक निबंध सुजय पोटे यांनी काम पाहिले. जितेंद्र शेळके, शरद दराडे, अनिल पाटील, देविदास बागडे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.