निलेश गौतम, सटाणा
तालुक्यात सहकारामध्ये अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या सटाणा मर्चंट को -ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणूक पूर्व तैयारीला वेग आला आहे. नऊ हजार सभासद संख्या आणि शंभर कोटींच्या ठेवी सह 147 कोटींची उलाढाल असलेल्या या बँकेच्या निवडणुकीला विशेष महत्त्वा आहे.
सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून पॅनल निर्मिती आणि पुढील राजकीय आखाडे बांधण्यास सुरवात झाली आहे. तालुकाभर सभासद संख्या असलेल्या सहकारातील सटाणा मर्चंट को ऑप बँकेच्या निवडणुकीला तालुक्यातील सहकारात अनन्य साधारण महत्व आहे. तालुक्यासह सटाणा शहरातील व्यापारी वर्गाची धनलक्ष्मी म्हणुन नावलौकिक असलेल्या या बँकेच्या दोन शाखा आहेत. सटाणा मुख्य शाखा तर नामपुर येथे उपशाखा असा विस्तार असलेली ही बँक मागच्या पंचवार्षिक मध्ये दोन वेळा प्रशासक बसुन ही सभासदांच्या विश्वासास पात्र ठरली आहे.
कोरोना मुळे दोन वर्षे मुदत वाढ मिळालेले संचालक मंडळ आणि विरोधकांनी संचालक मंडळाला विविध मुद्यावर सहकाराच्या कचाट्यात पकडण्याचा केलेला प्रयत्न यामुळे समको बँक जिल्ह्याच्या सहकार तक्त्यावर कायमच चर्चित राहीली आहे. सध्या सहकारातील विविध संस्थाच्या निवडणुका होत आहेत. सटाणा मर्चंट बँकेची ही निवडणुक होणार असल्याने विरोधी गटाचे प्रमुख डॉ व्ही. के. येवलकर आणि सहकारीनी श्री सिद्धिविनायक पॅनल ची निर्मिती करीत उमेदवारांची मोट बांधण्यास सुरवात केली आहे.सभासदांना सोशल मीडिया ,पत्रक बाजीच्या माध्यमातून संपर्क करीत अप्रत्यक्ष रित्या प्रचाराला सुरवात केली आहे.
तर सत्ताधारी गटाने समकोचे माजी चेअरमन श्रीधर कोठावदे यांच्या नेतृत्वाखाली आदर्श पॅनल ची निर्मिती केली आहे .तालुकाभर सभासद असले तरी शहरातील सभासद असलेल्या व्यापारी वर्गाचा बँकेवर असलेला प्रभाव हा कायम टिकून आहे. ग्रामीण भागातून बँकेवर संचालक म्हणुन निवडून जाण्याची संधीआज पर्यंत क्वचितच मिळाली आहे. मात्र यावेळी दोघा ही पॅनल कडुन ग्रामीण भागातून संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत . यामध्ये ग्रामीण भागातून कोणत्या पॅनल मध्ये कोणाची वर्णी लागते ते पॅनल निर्मिती नंतरच समजणार असले तरी ग्रामीण सभासदांना आपला हक्काचा संचालक पाहिजे म्हणून आता ग्रामीण सभासद आपआपल्या भागातील सभासदाला पॅनल मध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
प्रामुख्याने मोसम आणि आरम खोऱ्यात सभासद संख्या जास्त असल्याने ग्रामीण भागातून संचालक होण्याची संधी कोणाला मिळते हे येणाऱ्या काळातच समजेल. या पुर्वी अनेक दिग्गजानी समकोचे चेअरमन व संचालक पद भूषविलेले आहे. यामध्ये माजी आमदार संजय चव्हाण, साखरचंद राका, गोविंद शंकर गहिवड, अशोक लक्ष्मण येवला, रमेश संभाजी देवरे, शांतीलाल राका, सोमनाथ ब्रम्हाणकार, रामकृष्ण येवला सुभाष ततार, यांच्या सारख्या दिग्गजांनी बँकेची धुरा सांभाळलेली आहे. गत पंचवार्षिक मध्ये कधी नव्हे एवढा बँकेचा वाद चव्हाट्यावर आल्याने सहकारातील अग्रणी समजल्या जाणाऱ्या समकोची मात्र सहकार दरबारी बऱ्यापैकी इभ्रत गेली असली तरी यातुन तावून सलाखुन निघलेल्या सटाणा मर्चंट को -ऑफ बँकेची सत्ता सभासद नेमकी कोणाच्या हातात देणार हे सांगणे तूर्तास तरी अवघड आहे.