सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सटाणा शहरासह कळवण, मालेगाव तसेच गिरणा नदीवर असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा उद्भव आटल्याने सध्या या तीनही तालुक्यात भीषण पाणीटंचाई उद्भवली असून शेती सिंचनाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. टंचाईमुळे सटाणा पालिकेतर्फे शहरात तीन दिवसाआड कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
आगामी चैत्रोत्सव व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर या टंचाईवर मात करण्यासाठी चणकापुर किंवा पुनंद धरणातून गिरणा नदीपात्रात तात्काळ आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी जिल्हाधिकारी गंगाधरन डी यांची आज गुरुवार (ता.७) रोजी भेट घेतली. दरम्यान, या भेटीनंतर जिल्हाधिकार्यांनी येत्या रविवार (ता.१०) रोजी गिरणा नदीपात्रात पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्याचे सौ.चव्हाण यांनी सांगितले.
यासंदर्भात माजी आमदार सौ.चव्हाण यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात, सध्या ४२ ते ४३ अंश सेल्सिअस तापमान असल्याने सटाणा, कळवण, मालेगाव तसेच गिरणा नदीवर असलेल्या सर्वच सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा उद्भव आटला आहे. त्यामुळे सर्वत्र पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून शेती सिंचनाचा प्रश्नही गंभीर झाला आहे. सटाणा पालिका प्रशासनाकडून शहरात सध्या तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या गिरणा नदीपात्रात पाणी आले नाही तर नाइलाजाने पाच ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिका प्रशासनावर येऊ शकते. टंचाईमुळे महिला भगिनींना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तर काही नागरिकांना टॅंकरने विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे.
उच्च तापमानाच्या झळा मुक्या जनावरांना बसत आहे. येत्या काही दिवसात वणी येथील सप्तश्रुंगी गडावरील चैत्रोत्सवाची यात्रा सुरू होत आहे. यात्रोत्सवासाठी धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशातून लाखो भाविक हजेरी लावण्याची शक्यता आहे. परंतु पाणी टंचाई असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होणार आहे. त्याचबरोबर सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रामजाण हा सण सुद्धा सुरू आहे. मात्र टंचाईमुळे सण-उत्सवांच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळे तातडीने चणकापुर किंवा पुनंद धरणातून गिरणा नदीपात्रात तात्काळ आवर्तन सोडून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणीही सौ.चव्हाण यांनी निवेदनात केली आहे.