सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सटाणा पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर धाडसी घरफोडी झाली आहे. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास केले. त्याचबरोबर घरासमोर पार्क केलेली इनोव्हा क्रिष्टा कारही लंपास केली आहे. यामुळे सटाण्यात खळबळ उडाली आहे. मराठा हायस्कूलगत वास्तव्यास असलेले ठेकेदार निखिल आहिरे यांच्या घरात ही चोरी झाली आहे.
मिळालेल्या महितीनुसार, निखिल आहिरे आपल्या कुटुंबियांसोबत नाशिक येथे गेले होते.घराला कुलूप असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास आहिरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील रोख रक्कम ९० हजार,१५ तोळे सोन्याचे दागिने लंपास करत आहिरे यांची घरासमोर उभी असलेली ३० लाख रुपयांची इनोव्हा क्रिष्टा (एम एच १५ जी एक्स २१३३) चोरून नेली आहे.घटनेची माहिती आज सकाळी पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण केले असता श्वान पथकाने ताहराबाद रस्त्यापर्यंत माघ दाखविला.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून घरासमोर उभी असलेली इनोव्हा कार ताहाराबाद कडे घेवून पसार झाल्याचे सूर्या लॉंन्स वरील सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्टपणे दिसते आहे.अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती,डीवायएपी पुष्कराज सूर्यवंशी,प्रभारी पोलीस अधिकारी रजनीकांत चिलूमुला,किरण पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून या गंभीर घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना केली आहेत.
दरम्यान सटाणा शहरासाठी घरफोडीचा प्रकार नवा नसला तरी या घटनेत चोरट्यांनी घरफोडीसोबत घरसमोर उभी असलेली महागडी इनोव्हा कारही चोरून नेल्याने या चोरीचा छडा लावण्याचे मोठे आवाहन आयपीएस रजनीकांत चिलूमुला यांच्यावर आहे.
satana crime dacoity police vehicle theft
nashik district rural