सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गारपीट व अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिल्याने बागलाण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून शेतीपिकांसाठी घेतलेले कर्ज फेडता येईल का नाही या विंवचनेत शेतकरी सापडला आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देत आदेश देऊनही तालुक्यातील महसूल व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी पंचनामे करण्यास अक्षम्य दिरंगाई करीत असल्याच्या तक्रारी शेतकर्यांनी केल्या आहेत. त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाने दिरंगाई न करता बळीराजाला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, यासाठी युद्धपातळीवर सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी आग्रही मागणी राज्य महिला आयोगाच्या सदस्या व माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे.
याबाबत माजी आमदार सौ.चव्हाण यांनी जिल्हाधिकारी गंगाधरण डी. यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले. बागलाण तालुक्यात ६० ते ६५ गावांमध्ये गारपीट व अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिल्याने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. फळबागांसह इतर कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला आदि पिकेही हातची गेल्याने शेतकर्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. शेतीपिकांसाठी घेतलेले कर्ज फेडता येईल का नाही, या विंवचनेत बागलाणचा शेतकरी सापडला असून आत्महत्येशिवाय दूसरा मार्ग नसल्याची कैफियत काही शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी बागलाण तालुक्यातील करंजाड, निताणे, बिजोटे, आखतवाडे या गावांचा प्रत्यक्ष दौरा करुन पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी एकही बाधीत शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये अशा सूचना महसूल आणि कृषी विभागाला देऊन लवकरात लवकर पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या होत्या. मात्र मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच चित्र उलटे झाले. संबंधित गावांतील तलाठी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक हे पंचनामे करतांना अक्षम्य दिरंगाई करीत असल्याच्या तक्रारी शेतकर्यांनी माझ्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, मोबाईलवरुन बोलून केल्या आहेत.
या कामामध्ये अधिकारी व कर्मचारी विद्यमान लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडेही दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे हा विद्यमान लोकप्रतिनिधींचा अवमान आहे. तालुक्यातील अतिवृष्टी व गारपीट झालेल्या ६० ते ६५ गावांमधील कोणताही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही. यासाठी प्रत्येक बाधीत शेतकऱ्याच्या शेतात युद्धपातळीवर सरसकट पंचनामे करून शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणीही सौ.चव्हाण यांनी निवेदनात केली आहे.
Satana Agri Crop Loss CM Visit Panchaname