निलेश गौतम, सटाणा
कळवण उपजिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर बागलाण वासियांसाठी आरोग्याच्या सर्व सुख सुविधायुक्त उपजिल्हा रुग्णालय निर्मितीस राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बागलान च्या उपजिल्हा रुग्णालय निर्मितीच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहमती दिली आहे.बागलाण उपजिल्हा रुग्णालयासाठीचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीसमोर सादर करण्यात आला असून लवकरच त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल,अशी महत्त्वपूर्ण माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली आहे.
बुधवारी(दि.१) रोजी आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी याबाबत अधिक माहिती देताना आमदार दिलीप बोरसे यांनी या नवीन उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधेमुळे तालुक्यातील जनतेची आरोग्यविषयक होणारी गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे असा आशावाद आमदार दिलीप बोरसे यांनी व्यक्त केला.सटाणा शहरात ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात असून याठिकाणी मिळणाऱ्या सोयी सुविधांना मर्यादा येतात.त्यामुळे तालुकावासीयांची मोठी गैरसोय होते. आदिवासी बहुल तालुक्यात शासकीय आरोग्य सेवा उपलब्ध होणे अतिशय गरजेचे आहे.त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला शासनाच्या आरोग्य सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळावा या हेतूने सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयाऐवजी उपजिल्हा रुग्णालय निर्मितीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.यासाठी शासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला त्यास मोठे यश मिळाल्याचे आमदार बोरसे यांनी सांगितले.
सटाणा ग्रामीण रुग्णालयात विक्रमी बाह्यरुग्ण तपासणी असून तज्ञ डॉक्टर आणि शस्त्रक्रियेच्या सुविधा नसल्याने तालुकावासीयांना कळवण किंवा नाशिक येथील रुग्णालयात जावे लागते.यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो.ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या गोरगरीब महिलांना अवघड आणि किचकट शस्त्रक्रिया आणि प्रसूतीसाठी प्रसंगी मालेगाव,धुळे किंवा नाशिकला पाठवावे लागते. कोरोनाच्या अभूतपूर्व संकट समयीदेखील तज्ञ व सोयी सुविधा आणि साधनसामुग्रीच्या अभावामुळे तालुका वासीयांची परवड झाली होती. भविष्यात पुन्हा अशा आपत्ती काळात बागलाणवासीयांची गैरसोय होऊ नये यासाठी सटाणा येथेच उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित व्हावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून पाठपुरावा करण्यात येत होता.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला असून त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही या मागणीसाठी सकारात्मक सहकार्य लाभले.त्यामुळे बागलाणच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे पाठविण्यात आला आहे.त्यास लवकरच मान्यता मिळेल असेही आमदार बोरसे यांनी सांगितले.
सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालयात केवळ ३० खाटा असून उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाल्यानंतर या ठिकाणी तब्बल १०० खाटा उपलब्ध होतील.सोबतच बालरोग तज्ञ,स्त्रीरोग तज्ञ तसेच सर्जन व अन्य तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होतील शिवाय इतर अनुषंगिक शस्त्रक्रियांसाठीदेखील आवश्यक साधनसामग्री आणि मनुष्यबळदेखील उपलब्ध होईल.त्यामुळे तालुक्यातील जनतेची आरोग्यविषयक सेवा सुविधांसाठी होणारी परवड थांबणार असून उपजिल्हा रुग्णालय प्रस्तावास मंजुरी व निधी मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.लवकरच त्यास मंजुरी मिळून प्रत्यक्ष कार्यवाही होईल असेही शेवटी आमदार दिलीप बोरसे यांनी सांगितले .
Satana 100 Bed Government Hospital Will Start Soon