इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
धुळे जिल्हयातील सोनगीर येथील सरपंच रंजना मोरे यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले आहे. सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
सोनगीर येथील वार्ड क्रमांक एकची पोट निवडणूक ऑक्टोंबर २०२३ मध्ये झाली होती. या निवडणुकीत रंजना मोरे या विजयी झाल्या होत्या. जानेवारी २०२४ मध्ये त्यांची सरपंचपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नामनिर्देशक पत्र दाखल करतांना त्यांनी स्वत.चे घर हे अतिक्रमण नसल्याचे नोंद केले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या नावावर सोनगीर ग्रामपंचायतीच्या नोंदणीनुसार बांधकाम हे अतिक्रमण जागेवर असल्याची तक्रार माजी सरपंच असलेल्या रुक्मिणी ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
या प्रकरणी गटविकास अधिका-यांनी अहवाल तयार केला. त्यात मोरे यांच्या नावावरील मालमत्ता ही ग्रामपंचायतीच्या जागेवर असल्याचे दिसून आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी रंजना मोरे यांचे ग्रामपंचायतीचे सदस्य व सरपंच म्हणून या पदावर राहण्यास अपात्र घोषित केले.
धुळे जिल्ह्यात एकाच पंचवार्षिक काळात दोन सरंपच अपात्र झाल्याची ही पहिलीच घटना असून याआधी माजी सरपंच रुक्मिणी ठाकरे यांना त्यांचे भाऊ श्यामलाल मोरे यांनी त्यांच्याबद्दल तक्रारी अर्ज करुन सदस्य व सरपंचपदी राहण्यास अपात्र ठरवले होते. त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे.