नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– देवळाली मतदार संघात आपण विकासकामे करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे. त्यात जातीभाव केला जात असल्याचा विरोधकांचा आरोप हा तथ्यहीन आणि बिनबुडाचा असून त्यामागे केवळ मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा दावा देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत केला. मतदार संघात १०१ कोटी निधीची विकासकामे असूनही काही टक्केखोर दलाल अर्धवट माहितीच्या आधारे राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीयवादाचे विष पेरत असल्याचा आरोप आहिरे यांनी केला. गिरणारे गटात गेले तर तोंडाला काळे फासण्याचा विरोधकांनी त्यांना इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आपण गिरणारे गटात एकटी आणि तेही दुचाकीवर जाणार आमदार सरोज आहिरे यांनी आपल्या राजकीय विरोधकांना प्रतिआव्हान दिले.
मागासवर्गीय वस्त्या आणि गावांतील विकासकामाच्या मुद्द्यांवर आमदार सरोज आहिरे यांनी राजकारण केल्याचा आरोप करून गिरणारे गटात त्या आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा त्यांना त्यांच्या राजकीय विरोधकांनी दिला होता. या प्रकारानंतर आमदार सरोज आहिरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत विरोधकांनी केलेले सर्व आरोप खोडून काढत गेल्या अडीच वर्षात मतदार संघात नेमकी किती कामे केली याविषयी माहिती दिली. याबरोबरच गिरणारे गटात पाय ठेवल्यास तोंडाला काळे फासण्याचा इशारा देणा-या राजकीय विरोधकांना त्यांनी आपण गिरणारे गटात स्वतः दुचाकीवरून जाणार असल्याचे आव्हान दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विकासाचे, समतेचे विचार माझ्या मनात आहेत. त्यामुळे आपल्याला जातीभेदाच्या विचारांत अडकवण्याचा कोणी प्रयत्न करू नये. २०२४ मध्ये होणारी निवडणूक आपण नीळ-गुलालाच्या नव्हे तर केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढणार असल्याचेही यावेळी आहिरे यांनी सांगितले. याप्रसंगी मनोहर कोरडे, निवृत्ती अरिंगळे, बाळासाहेब म्हस्के, सोमनाथ बोराडे, राजाराम धनवटे आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मतदारसंघात आजवर केवळ नीळ की गुलाल या मुद्द्यावर राजकारण झाल्याचा आरोप यावेळी आमदार सरोज आहिरे यांनी केला. आपल्या आमदारकीच्या उर्वरित कालावधीत मतदारसंघात आपण ५०० कोटीच्या विकासानिधीचा पल्ला गाठू असा विश्वास त्यांनी त्यक्त केला. गिरणारे गटातील १८ गावांत १०१ कोटीच्या निधीची विकासकामे मंजूर असून २४ कोटीची विकासकामे सध्या गिरणारे गटात सुरु आहेत. आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. आजवर मतदार संघातील मागासवर्गीय वस्त्यांवर शौचालये, गटारी आणि रस्त्यांची कामे झाली नव्हती अशी टीका त्यांनी त्यांचे राजकीय विरोधक बबन घोलप यांच्यावर नाव न घेता केली. भाजपचे कार्यकर्तेही जनमानसात आपली प्रतिमा मलीन करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. लाखलगाव कब्रस्तानच्या कामासाठी जास्त निधीची गरज होती, उपलब्ध निधी कमी होता, त्याच्यात शिंदे गावाच्या कब्रस्तानचे काम होऊ शकत होते म्हणून शिंदे गावाला तो निधी वर्ग केला, त्या वेळीही अल्पसंख्याक समाजात तेढ निर्माण करण्याचा झालेला प्रयत्न चुकीचा असून अशा प्रवृत्तींची राष्ट्रवादी पक्ष गय करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. २० टक्के राजकारण अन ८० टक्के सामाजकारण असे गणित आपण करीत नाही, ज्यांनी केला त्यानी ते प्रत्यक्ष केले असते तर सरोज आहिरे यांचा उगम का झाला? असा सवाल आहिरे यांनी घोलप यांना नाव घेता केला.