इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अख्ख्या महाराष्ट्राचे लाडक्या ‘लिटिल चॅम्प्स’मधील मोदक आणि लिटिल मॉनिटर या दोघांनी ‘आमचं ठरलं’ अशी घोषणा काय केली, संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला. अगदी आपल्या घरातील लग्न ठरल्याप्रमाणे सगळे आनंदले. एवढं प्रेम या दोघांनी कमावलं आहे. तर आता या दोघांच्या लग्नाची तारीख ठरली असल्याची चर्चा आहे. त्या अनुषंगाने प्रथमेश लघाटे याचे नुकतेच केळवण पार पडले. आपल्या या केळवणाची बातमी त्याने लगेच सोशल मीडियाच्या द्वारे चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय
प्रथमेश सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. कधी आपल्या स्वरांनी तो चाहत्यांचं मनोरंजन करतो तर, कधी चमचमीत पदार्थांच्या रेसिपी शेअर करून सगळ्यांच्याच तोंडाला पाणी आणतो. प्रथमेश लघाटे – मुग्धा वैशंपायन ही जोडी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. नुकताच प्रथमेश याने एक व्हिडीओ शेअर करत याची हिंट दिली आहे. प्रथमेश लघाटे याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर केळवण समारंभाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. नुकतंच प्रथमेशचं केळवण साग्रसंगीत पार पडलं. या व्हिडीओमध्ये प्रथमेश लघाटे याचे भरपूर लाड होताना दिसत आहेत.
काय आहे पोस्टमध्ये?
‘आमचं ठरलंयच्या घोषणेनंतर आता हळूहळू केळवाणांना सुरुवात होतीय! हे फीलिंग खूप भारी आहे! अतिशय पारंपरिक पद्धतीने, प्रचंड आपुलकीने, पंचपक्वान्नांच्या जेवणाने, अतिशय आग्रहाने खाऊ घालून माझ्या केळवणांचा शुभारंभ “चतुरंग”ने केला त्याबद्दल चतुरंगच्या पूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद!’, असे म्हणत प्रथमेश लघाटे याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रथमेशसाठी हे केळवण खूपच खास होतं, कारण त्याने नात्याची कबुली दिल्यानंतरचं हे पहिलच केळवण होतं. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं आहे की काही महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी नेसून प्रथमेशला ओवाळले. पारंपरिक पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या केळवणामध्ये प्रथमेशच्या चेहऱ्यावरील आनंद अजिबात लपत नव्हता. रत्नागिरीतील चतुरंग प्रतिष्ठानने हे केळवण आयोजित केले होते. मात्र तो या सोहळ्यात मुग्धाला मिस करत होता. यावेळी प्रथमेशने खास उखाणाही घेतला. प्रथमेश म्हणतो की, ‘वाढलेलं पान रिकामं केलं एक एक घास घेत घेत, वाढलेलं पान रिकामं केलं एक एक घास घेत घेत… चतुरंगच्या कार्यालयात माझ्या केळवणाचा फक्कड जमला बेत’.
महाराष्ट्राचे लाडके लिटील चॅम्प्स प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. नुकतीच प्रथमेशने एका मुलाखतीमध्ये त्याची लव्हस्टोरी देखील सांगितली होती. मुग्धा आणि प्रथमेशची पहिली भेट सारेगमपच्या सेटवर झाली होती. या शोनंतर देखील त्यांचे गाण्याचे कार्यक्रम व्हायचे. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे नात्यात रुपांतर झाले. एका कार्यक्रमाची तालीम सुरु असताना प्रथमेशने मुग्धाला प्रपोज केले. मुग्धाला त्याची जाणीव होती. तिने देखील त्याला तीन चार दिवस घेऊन त्याला आपला होकार कळवला होता.