इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक नुकतेच जाहीर करण्यात आले. आता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोण करणार, अशी उत्सुकता सर्वांना होती. आता त्याचेही उत्तर मिळाले असून, एक लोकप्रिय अभिनेत्री या पर्वाचे सूत्रसंचालन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या पर्वामध्ये परीक्षकांच्या भूमिकेमध्ये सुरेश वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सलील कुलकर्णी आणि गायिका वैशाली माडे दिसणार आहे. याआधीच्या पर्वात पहिल्याच लिटिल चॅम्प्समधील पाच जणांना परीक्षकाच्या भूमिकेत आपण पाहिले होते. मात्र, त्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आले. आता परीक्षकांच्या भूमिकेत डॉ.सलील कुलकर्णी आणि गायिका वैशाली माडे दिसतील तर सुरेश वाडकर देखील मुलांना विशेष मार्गदर्शन करतील. तर मागील पर्वाप्रमाणे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या पर्वात देखील सूत्रसंचालन करणार आहे.
९ ऑगस्ट पासून ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चे नवीन पर्व सुरू होते आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. आता सूत्रसंचालकाची देखील घोषणा झाली आहे. आता हा कार्यक्रम सुरू होण्याची वाट रसिक पहात आहेत.
याबद्दल मृण्मयी सांगते, ‘मी स्वतः अकरावीपर्यंत शास्त्रीय संगीत शिकले आहे. घरी संगीताचा वारसा आहे. ‘सारेगमप’ या कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन करावं हे माझ्या आईचं स्वप्न होतं त्यामुळे या कार्यक्रमासाठी मला विचारण्यात आलं तेव्हा मी लगेचच होकार दिला. मुळातच गाणं हा विषयच माझ्या खूप जवळचा आहे त्यामुळे मी सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वासाठी खूप उत्सुक आहे.’ मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांना सांभाळणं अवघड असतं. त्यांना बोलतं करण्याचं, त्यांचा आत्मविश्वास कायम ठेवण्याचं, त्यांना धीर देण्याचं आव्हान माझ्यासमोर आहे. हे मला उत्तमरीत्या जमेल अशी आशा आहे.’