नाशिक – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवी गडावर यंदाचा नवरात्रोत्सव कोरोनाचे विविध नियम पाळूनच साजरा करावा लागणार आहे. गेल्या वर्षी मंदिर पूर्णपणे बंद होते. मात्र यंदा नवरात्र उत्सव काळात दर तासाला १२०० भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे दिवसभरात २८ हजार देवी भक्तांना देवीचे दर्शन होणार असल्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
गडावरील नवरात्रोत्सव तयारीबाबत सहाय्यक उपजिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. त्यास पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत सप्तशृंगीगड, सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्ट, तलाठी, ग्रामसेवक व व्यापारी उपस्थित होते. बैठकीत झालेले निर्णय असे
गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मास्क, सॅनिटायझर सोबत ठेवावे लागणार
ज्या भाविकांचे लसीकरण झाले असेल अशाच भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार
स्नानासाठी असलेले शिवालय तीर्थ भाविकांसाठी बंद असेल.
बाहेर गावाहून आलेल्या भाविकांना नांदूरी येथील बसस्थानकावर उतरावे लागेल.
नांदूरी येथून एसटी बसनेच गडावर जाता येईल.
७ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर काळात मंदिर २४ तास दर्शनासाठी उघडे राहणार आहे.
कोरोना लस पासशिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नाही
६५ वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला व १० वर्षाखालील मुलांना गडावर प्रवेश नाही
पाससाठी करोना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असेल.
७२ तासामधील आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असेल किंवा २४ तासातील अँटीजन टेस्ट अनिवार्य असेल
मंदिरात प्रवेश करताना मास्क बंधनकारक असेल
सामाजिक अंतर ठेवून मंदिरात दर्शन दिले जाईल.
नवरात्र काळात नांदुरी व सप्तशृंगीगड येथे यात्रा भरण्यास परवानगी नसेल
नांदुरी येथे खासगी वाहनतळावर भाविकांना त्यांचे खासगी वाहन पार्क करावे लागेल
एसटी बसमध्ये प्रवेश करताना पास दाखविणे अनिवार्य असेल
एसटी बसेस ५० टक्के क्षमतेने प्रवासासाठी परवानगी असेल