नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सप्तशृंग गडाजवळील मार्कंडेय पर्वतावर आज भाविकांची प्रचंड गर्दी आहे. सोमवती अमावस्येनिमित्त भाविक येथे दर्शनाला आले आहेत. मात्र, याच दरम्यान याठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत २ भाविक जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सप्तशृंग गडा जवळ असलेल्या मार्कंडेय पर्वतावर सोमवती अमावस्येनिमित्त दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी आहे. त्यातच परिसरात धुके आणि पावसाचे वातावरण आहे. अशातच पर्वतावर दरड कोसळली आहे. दरड पडून दोन भाविक गंभीर जखमी झाले आहेत. ही बाब लक्षात घेताच तातडीने १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क करण्यात आला. जखमींना उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेतून वणी ग्रामिण रुग्णालयात दाखल आले आहे. प्राथमिक उपचारानंतर या दोघांना नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
सोमवती अमावस्ये निमित्ताने रविवारी रात्री पासtनच अनेक भाविक मार्कंडेय पर्वतावर मुक्कामी गेले. तर सोमवारी भाविकांची प्रचंड गर्दी पर्वतावर झाली. मार्कंडेय ऋषी यांनी सप्तशतीचे पाठ भगवती सप्तशृंगीला या ठिकाणी सांगितले. त्यामुळे या स्थानाची महती मोठी आहे. परिणामी, महाराष्ट्र व गुजरात राज्याबरोबर इतर राज्यातील भाविक मार्कंडेय ऋषींच्या मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी येतात. नवसही फेडतात.
आज सकाळच्या सुमारास बाळुू गजराम चारोस्कर (वय 57, रा.तळेगाव दिंडोरी) आणि अशोक मनोहर गायकवाड (रा. नाशिक) हे दोघे भाविक पर्वत चढत होते. थकवा व दम लागल्याने ते विश्रांती घेण्यासाठी तळालगतच्या भागात बसले. त्याचवेळी अचानक पर्वतावरुन भला मोठा दगड या दोघांच्या अंगावर पडला. त्यामुळे हे दोघे गंभीर जखमी झाले. पावासामुळे दगडांखालील माती ओली झाल्याने सदर दगड पर्वतावरुन कोसळल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सप्तशृंग गडावरही दरड कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्याची दखल घेत मंदिराच्या वरच्या भागात जाळी बसविण्यात आली आहे. आता मार्कंडेय पर्वतावर दरड कोसळली आहे. दरम्यान, ही घटना घडताच भाविकांमध्ये खळबळ निर्माण झाली. प्रशासनानेही याची दखल घेतली आहे. याठिकाणी पोलिस बंदोबस्त आहे. तसेच, भाविकांना खबरदारीची सूचना देण्यात आली आहे. याठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.