श्रीचक्रधर प्रभू अवतार दिन अष्ट शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजन
नाशिक – श्रीक्षेत्र नाशिक येथे सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू अवतार दिन अष्ट शताब्दी महोत्सवानिमित्त संपूर्ण भारतभरातील महानुभाव पंथीय संत, महंत, भिक्षुक, वासनिक तसेच तपस्वीनी माता, पुजारी व नामधारक बंधू-भगिनींच्या एकत्र पंथीय विचारविनिमय करण्याच्या दृष्टीने तसेच सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू यांच्या विचारांना सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय महानुभाव पंथीय संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संत संमेलन दि. २९ ते ३१ ऑगस्ट २०२२ रोजी नाशिक येथे होणार आहे. या संदर्भात नियोजन व चर्चा करण्यासाठीची बैठक नाशिक येथे माजी आमदार व आगामी संमेलनाचे मुख्य आयोजक बाळासाहेब सानप यांच्या नांदूरनाका येथील फार्म हाऊसवर संपन्न झाली.
या बैठकीच्या दरम्यान जिल्हा निवासी संत, महंत तसेच जिल्ह्यातील वासनिक व पुजारी उपस्थित होते. त्यामध्ये सुकेना निवासी पूजनीय आचार्य महंत श्रीसुकेणेकर बाबा, महंत डोळसकर बाबा, महंत चिरडे बाबा, महंत कृष्णराज मराठे बाबा, आमदार बाळासाहेब सानप आदिंनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा निवासी पूजनीय महंत वालहेराज बाबा, महंत सायराज बाबा, महंत परसराम बाबा, महंत गोपिराज शास्त्री तसेच नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, प्रकाश भाऊ ननावरे, सुरेशभाऊ डोळसे, मा. राजेंद्रजी जायभावे, लक्ष्मणराव जायभावे, भास्करराव सोनवणे, भास्करराव गावित, वैद्य , आप्पा भोजने , नंदूभाऊ हांडे, किरण मते, दत्ताभाऊ गवळी आदिंनी नियोजनासंदर्भात चर्चा केली.
याप्रसंगी जिल्ह्यातील अनेक संत-महंत वासनिक या ठिकाणी उपस्थित होते. यासंदर्भातील पुढील बैठक तसेच उर्वरित कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. रविवार १९ जून रोजी दिनकर अण्णा पाटील यांचे निवास स्थानी, इंग्लिश मिडीयम स्कूल, गंगापूर गाव येथे दुपारी ४ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.