मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – थोर संत सेवालाल महाराज यांनी तीनशे वर्षांपूर्वी पाण्याचा अपव्यय न करण्याचा तसेच पाणी जपून वापरण्याचा दिलेला विचार आजच्या युगात विशेष प्रासंगिक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. ७) बंजारा भाषेतील संत मारो सेवालाल या चित्रपटाच्या पोस्टर, माहितीपत्रक व टीजरचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
देशातील आदिवासी, वनवासी तसेच बंजारा समाजाचे देशाच्या विकासात फार मोठे योगदान आहे. समाजाने पर्यावरण, वृक्ष संवर्धन व औषधी वनस्पतींच्या उपयोगाचा मार्ग दाखवला, असे राज्यपालांनी सांगितले. बंजारा समाजाच्या पारंपरिक ज्ञानाचा समाजाने उपयोग केला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.
संत सेवालाल महाराज यांनी बंजारा समाजाला उत्तम जीवन जगण्याचा मार्ग दाखवला व समाज उद्धाराचे काम केले. ‘एक दिवस पाणी मोल देऊन विकत घ्यावे लागेल’ असा इशारा त्यांनी तीनशे वर्षांपूर्वी दिला होता, असे चित्रपटाच्या सहनिर्मात्या दिपाली भोसले सय्यद यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला संत सेवालाल यांचे वंशज महंत जितेंद्र महाराज, लेखक-दिग्दर्शक अरुण मोहन राठोड, जितेश राठोड तसेच चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.
Sant Maro Sevalal Film Poster Inauguration
Governor Bhagat Singh Koshyari