औरंगाबाद ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांगलीच्या संकेत महादेव सरगर यांनी वेटलिफ्टिंगमध्ये पुरूषांच्या ५५ किलो गटात रौप्यपदक पटकावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद येथे मोठी घोषणा केली. संकेत सरगर यांना राज्य सरकारकडून ३० लाख तर त्यांच्या प्रशिक्षकाला साडेसात लाख रुपये देणार असल्याचे सांगितले. बर्मिंगहममधील या स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले पदक आहे.
संकेत सरगर हा सांगली जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचा खेळाडू असून त्याने २०१३-१४ पासून गुरूवर्य कै. नाना सिंहासने यांच्या सांगलीतील दिग्विजय वेटलिफ्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये वयाच्या १३ व्या वर्षापासून वेटलिफ्टिंगचे धडे घ्यावयास सुरूवात केली. नाना सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचा पाया भक्कम झाल्यावर संकेतने २०१७ पासून शिवछत्रपती पुरस्कार विजेते मयुर सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील धडे घेतले. त्यांनी संकेतच्या ट्रेनिंगची दीर्घकालीन योजना आखली. ट्रेनिंग, डायट, रेस्ट व इंज्युरी मॅनेंजमेंट याचा योग्य ताळमेळ घालत संकेतचा सराव सुरू होता. त्याने २०१८ पासून राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेण्यास सुरूवात केली. ऑफ सिझनमध्ये दिवसातून तीन वेळाही त्याचे ट्रेनिंग असायचे. या मेहनतीमुळे २०१९ ते २०२० च्या दरम्यान त्याची कामगिरी उंचावली. संकेतने अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य मिळविले. जानेवारी २०२० ते मार्च २०२० दरम्यान सलग चार राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवत सुवर्णपदक मिळवून वरिष्ठ राष्ट्रीय उच्चांकही मिळविले. याची दखल घेत संकेतची भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘टॉप्स’ मध्ये निवड झाली.