मुंबई, (इंडिया दर्पण वृतसेवा)- छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेल संबंधित वादग्रस्त निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. वेदांत म्हणजेच विटस हॅाटेलच्या लिलावरुन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप करण्यात आले होते. संजय शिरसाट यांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगरमधील विटस हॅाटेलच्या लिलाव प्रक्रियेत बाजारभावानुसार किंमत ११० कोटी रुपये असतांना केवळ ६७ कोटी रुपयांत हॅाटेल विकत घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिरसाट यानी टेंडर प्रक्रियेतून माघार घेतल्याचे जाहीर केले होते. आता विधान परिषदेच्या सभागृहात या प्रकरणावरुन गोंधळ झाल्यानंतर चौकशी करण्यास मान्यता देण्यात आली.
विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री .फडणवीस बोलत होते.
संबंधित निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबविली जाणार आहे. धनदा कॉर्पोरेशनच्या मालकीच्या विट्स हॉटेलच्या निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात येईल.
संपूर्ण प्रकरणात पारदर्शकतेचे तत्व पाळले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कंपनीने २५ टक्के रक्कम भरली नाही त्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द झाली आहे. पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवत असताना पारदर्शकता पाळली जाईल आणि सर्व प्रक्रिया नियमानुसार राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.