इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ईडीच्या कार्यपध्दतीवर प्रश्न उपस्थितीत करत ईडीचा राजकीय वापर कसा होतो हे महाराष्ट्रात बघितल्याचे सांगितले. राजकीय लढाया न्यायालयाबाहेर लढल्या पाहिजेत. अशा लढाचा लढण्यासाठी ईडीचा वापर का केला जातो. त्यानंतर तुमचं राजकारण निवडणुकीत करा अशा शब्दात ना. गवई यांनी सरकारला खडे बोल सुनावले. त्यानतंर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांचे नरकातील स्वर्ग हे पुस्तक ना. गवई यांना पाठवले. त्याबाबतची पोस्टही त्यांनी सोशल मीडियात टाकली आहे.
राऊत यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना नरकातला स्वर्गची प्रत पाठवली. न्या.गवई यांनी ईडीचा राजकीय हत्यार म्हणून वापर होत असल्याचे निरीक्षण नोंदवले. महाराष्ट्रातील घटनांचा संदर्भ न्या.गवई यांनी दिला. ईडीचे अघोरी उद्योग कसे असतात तेच नरकातला स्वर्ग मध्ये मी सांगितले आहे.
राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळ्याचे आरोप करत ईडीने गुन्हा दाखल करुन अटक केली होती. त्यानंतर १०० दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, राऊत यांना जामीन देतांना न्यायालयाने ईडीच्या वकिलांना चांगलंच झापलं होतं. आपल्या १०० दिवसाच्या तुरुंगातील अनुभवावर आधारित संजय राऊत यांनी नंतर पुस्तक लिहले. हेच पुस्तक त्यांनी न्या. गवई यांना पाठवले.