इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यात जयराज स्पोर्टस व कन्व्हेन्शन सेंटरच्या उदघाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिल्यामुळे त्यावरुन राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होता. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले गुजराती बांधवांनी एकजूट कायम ठेवावी, राज्याच्या प्रगतीमध्ये तुमचा वाटा आहे. यानंतर भाषण संपवतांना एकनाथ शिंदे यांनी जयहिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली.
त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी व्हिडिओ शेअर करत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, शहा सेना! शहा सेना! अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले! पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर “जय गुजरात “ ची गर्जना केली! काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजाव्या, हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? असा सवाल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून हिंदीसक्तीचा वाद पेटलेला असतांना आता एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातची घोषणा करुन विरोधकांना टीका करण्याची संधी दिली आहे.