इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
झारखंडमधील दारू घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील कंत्राटदाराला अटक करण्यात आली आहे. सुमित फॅसिलिटी कंपनीचं संचालक अमित साळुंखेवर झारखंड एसीबीने ही कारवाई केली आहे. महाराष्ट्रात सुमित फॅसिलिटी कंपनीला १०८ नंबरच्या अॅम्बूलन्स चालवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या अटकेनंतर खा. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा. श्रीकांत शिंदे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाला. यासाठी ६०० कोटींनी टेंडर वाढवल्याचा दावा राऊतांननी केला आहे. या घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशनला वळवल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. याप्रकरणाचे धागेदोरे मंत्रिमंडळापर्यंत पोहोचल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.
तर दुसरीकडे आ. जितेंद्र आव्हाड यांनी झारखंडमध्ये सध्या दारू घोटाळा गाजत असून या घोटाळा प्रकरणात पुणेस्थित सुमित फॅसिलिटी कंपनीच्या संचालकाला अटक झाल्याने या घोटाळ्याची व्याप्ती वाढत चाललीय. झारखंडमध्ये सुमित फॅसिलिटी कंपनीला मनुष्यबळ पुरवठ्याचे काम मिळाले होते. आतापर्यंत या घोटाळा प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली आहे. निविदा भरताना कमी सर्व्हिस चार्ज भरून कामे घ्यायची आणि असे घोटाळे करायचे, ही या कंपनीची मोडस ॲापरेंडी असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात १०८ नंबरचे ॲम्बूलन्स चालवण्याचे काम सुमित फॅसिलिटीला देतानाही बराच वाद झाला होता आणि विरोधकांनी आरोपही केले होते असे सांगितले.