नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीला जाऊन अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास विरोध करणा-या शिंदे गटाची मागणी धुडकावून लावल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. राऊत आज नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी पत्रकारांशी बोलताना हा गौप्यस्फोट केला. यावेळी दिल्लीत नेमके काय घडले हेही त्यांनी सांगितले.
शिंदे गट दिल्लीला गेला होता त्यावेळे अर्थ खाते अजित पवार यांना द्यायचे नसेल तर अर्थ खाते तुमच्याकडे ठेवा आणि मुख्यमंत्रीपद अजित पवार यांना द्या, असा प्रस्ताव या भेटीत ठेवल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे गटाचे दिल्लीत काहीही ऐकले गेले नाही इतकेच नाही तर राहायचं असेल तर राहा असेही शिंदे गटाला सांगितल्याचे राऊत यांनी सांगितले. अर्थ खाते देऊ नये म्हणून त्यांनी आपट आपट आपटली. पण काहीच झालं नाही, असा टोला त्यांनी लगावला. शिंदे गटाचं महत्त्व फक्त शिवसेना फोडण्यापुरतेच होते. आता तेही महत्त्व संपले आहे.
अजित पवारच आमच्यासोबत नको हे शिंदे गटाचं म्हणणे होते. आता त्यांना टाळ्या वाजवण्याशिवाय पर्याय नाही. शिंदे गटाला अजित पवार यांची धुणीभांडी करावेच लागेल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि अजितदादा गटात जमीन अस्मानचा फरक असल्याचे स्पष्ट केले. अजितदादा गटातील नेत्यांनी अनेक वर्ष मंत्रीपद भोगले आहे.
यावेळी त्यांनी अजित पवार यांचा निर्णय योग्य नाही. तो महाराष्ट्राच्या हिताचा नाही. महाराष्ट्राचं भलं होणार नाही. तरीही अजितदादांचा अनुभव दांडगा आहे असेही राऊत यांनी सांगितले.