अनिल कदम यांना निवडून द्या, निष्ठेची किंमत नक्कीच देऊ!
निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात कधी नव्हे इतकी आमदार खासदार यांची सौदेबाजी केली गेली. जे गद्दार फुटले त्याची मुहूर्तमेढ यांच निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी पन्नास खोके घेऊन शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून केली. त्यांच्या गद्दारीला गाडायची वेळ आली असल्याचे सांगत निफाडची जागा तुतारीची होती पण मी आणि शरद पवार यांनी एकत्र बसून ती मशालकडे घेतली. हीच मशाल या सौदेबाजीला गाडल्या शिवाय राहणार नाही असा घणाघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं. बनकर यांना कोणतीही दया माया न दाखवता निष्ठेच्या बाजूने ठाम उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.आज राज्यात जी सत्तेची लफंगेगिरी सुरू आहे त्याचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे.ज्या छत्रपतींच्या नावाने मतं मागणारे त्यांच्याच पुतळ्यात भ्रष्टाचार करतात.महाराजांचा जेथे पुतळा उभारला होता ते काम सुमारे बावीस कोटींच्या निधीतून झाले पण दुर्दैव असं की त्यातून सुमारे एकवीस कोटींवर डल्ला मारला.
राऊत यांनी हाताचे प्रकल्प गुजरात मध्ये गेल्यामुळे बेरोजगारीत मोठी वाढ झाली असल्याचे सांगत महाविकास आघाडीची सत्ता आल्यास आम्ही सार्वजनिक प्रश्नांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. आर्धी मुंबई अदानीला विकण्याचा डाव सुरू आहे. अनेकांनी रक्त सांडत ही मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली अन् मोदी शहा हे तिचा लिलाव करायला निघाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.१५०० रुपये महिलांना देऊन त्यांची किंमत केली जाते आहे आमचे सरकार आले तर आम्ही ३००० देऊ असे त्यांनी सांगत महीलांना राज्यभर मोफत प्रवास देण्यात येईल. आम्ही घोषित केलेल्या जाहीरनाम्यात सगळी वचनं पाळली जातील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
अनिल कदम यांनी आपल्या मनोगतात निफाडकर जनता सज्ज असून जनतेने निवडणूक हातात घेतल्याचे सांगत यंदाची निवडणूक निष्ठा या शब्दावर असून जनता मला मशाल घेऊन मुंबईला पाठवेल असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.जे पी गावित यांनी आताच्या सरकारची धोरणं ही आदिवासी विरोधी असून निफाड सह जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
निफाड येथील झालेल्या विराट सभेस जे.पी गावित, माजी आमदार नरेंद्र दराडे,शरद आहेर,सुभाष कराड, राजेंद्र मोगल,दीपक बोरस्ते,दिगंबर गीते,राजाराम पानगव्हाणे,रमेश घुगे,निलेश पाटील, विजय जाधव, प्रकाश अडसरे,सुधीर कराड,माणिकराव कुंदे,विक्रम रंधवे, जावेद शेख,आशिष शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.