मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माझगाव सत्र न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवत १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा हा खटला दाखल केला होता. आयपीसीच्या कलम ५०० अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी सुरु होती. त्यानंतर हा निकाल देण्यात आला.
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्यावर सार्वजनिक प्रसाधनगृहाच बांधकाम आणि देखभालीच्या कामात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हे आरोप तथ्यहीन आणि बदनामीकारक आहेत असे म्हणत मेधा सोमय्या यांनी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. त्याचा आता निकाल आला आहे.
या निकालानंतर आता संजय राऊत या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात.