मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाचा ४० दिवसांनी विस्तार झाला आहे. मात्र, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात आरोप असलेले आणि गेल्या सरकारमध्ये मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड यांचा नव्या सरकारमध्ये समावेश झाला आहे. यावरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने टीकेची झोड उठवली आहे. मात्र, राठोड यांच्या समावेशामागे शिंदे यांची मोठी खेळी असल्याचे दिसून येत आहे.
पुण्यात पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये असताना संजय राठोड यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपने संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यामुळे संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली होती. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केले होते. आता शिवसेनेतून बंड केलेले आणि शिंदे गटात असलेले आमदार संजय राठोड हे मंत्री झाले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची आज शपथ घेतली. यावरून आता टीका होत आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून एकनाथ शिंदे यांनी एक वेगळीच खेळी करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचल्याचे बोलले जात आहे. यातून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची चाल यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकीकडे या स्मार्ट खेळीने शिवसेनेला सूचक संदेश दिला गेला आणि दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांची मने जिंकत आपले वर्चस्व पुन्हा दाखवून दिल्याचे म्हटले जात आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी केली. त्यामुळे दुखावलेला भाजप याचा वचपा काढणार असल्याचे उद्धव ठाकरे यांना चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे सरकार चालवताना गैरव्यवहार अथवा भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडू नयेत, यासाठी त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांवर करडी नजर ठेवली होती, असे सांगण्यात येत आहे. संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आरोप होताच उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांच्या दबावाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आग्रह धरल्याने उद्धव ठाकरेंची चांगलीच अडचण झाली. अशातच एकनाथ शिंदे हे संजय राठोड यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. तसेच राजीनामा घेऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे खूप आग्रह धरला होता. परंतु विरोधकांपुढे झुकण्याऐवजी आपण आपल्या मंत्र्याच्या मागे ठामपणे उभे राहायला हवे, असे शिंदे आग्रहाने सांगत होते. मात्र, शिवसेनेतीलच काही नेत्यांनी उद्धव यांच्यावर दबाव आणला. अखेर राठोड यांचा राजीनामा घ्यावा लागला.
संजय राठोड यांना वाचविण्यात शिंदे यांना यश आल्यास त्यांच्यामागे उभ्या राहणाऱ्या आमदारांची संख्या आणखी वाढेल, असे या नेत्यांना वाटत होते. त्यामुळे राठोड यांचा केवळ राजीनामा घेऊन ठेवला जाईल, राज्यपालांना तो सुपूर्द केला जाणार नाही, अशी शिंदे यांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांना देण्यात आला. त्यावर, पक्षप्रमुखांनी मला फसवले आहे. माझ्याकडे शिवसेनेची सूत्रे नसल्यानेच राठोड यांचा बळी गेला. सूत्रे माझ्याकडे असती तर मी हे कधीच होऊ दिले नसते, असे शिंदे यांनी आमदारांना सांगितले होते, असे म्हटले जाते.
या घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना हाताशी धरून अभूतपूर्व ऐतिहासिक बंड केले. उद्धव ठाकरेंसाठी प्रचंड मोठा धक्का होता. राजकीय सत्ता संघर्ष पराकोटीला गेल्यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत सरकार स्थापन केले. आता मंत्रिमंडळाच्या विस्तारात राठोड यांना संधी देत शिंदे यांनी आमदार वा मंत्र्यांना कसे सांभाळायचे असते हे उद्धव ठाकरे यांना दाखवून दिलेच, पण त्याचबरोबर दिलेला शब्द खरा करून दाखवत इतर आमदारांचीही मने जिंकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. राज्य मंत्रिमंडळात संजय राठोड यांची वर्णी लावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आपल्यासोबत काम करणाऱ्या मंत्र्याकडून काही चुका झाल्या तरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा थेट संदेशच उद्धव ठाकरेंना दिल्याचे बोलले जात आहे. अर्थात खरे खोटे येणारा काळच ठरवणार आहे.
Sanjay Rathod Cabinet Minister Eknath Shinde Politics
Maharashtra Government