मुंबई – गेल्या काही दिवसांपासून ब्रम्हगिरीसह संतोषा आणि भागडी डोंगररांग येथे अवैधरित्या उत्खनन होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर वन, महसूल आणि पर्यावरण विभाग यांनी एकत्ररित्या जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी करुन या संदर्भातील वस्तुस्तिथीदर्शक अहवाल येत्या आठ दिवसात सादर करावा असे निर्देश पर्यावरण आणि वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज दिले. सह्याद्री ब्रम्हगिरी पर्वत रांगेतील संतोषा भागडी डोंगररांग बेलगाव ढसा व सारुळ गाव येथील उत्खननाबाबत आज पर्यावरण आणि वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला वन, महसूल, पर्यावरण विभागाबरोबरच सेव्ह ब्रम्हगिरी मोहीम राबविणारे स्वयंसेवक उपस्थित होते.
राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, वन, महसूल आणि पर्यावरण यांनी एकत्ररित्या या सर्व ठिकाणी जाऊन वस्तुनिष्ठ माहिती गोळा करावी. या ठिकाणी पाहणी करीत असताना सेव्ह ब्रम्हगिरी मोहिम राबविणारे स्वयंसेवक यांनी उपस्थित राहावे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे याबाबतचा अहवाल तातडीने तयार करुन सादर करण्यात यावा. ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी सुरुंग स्फोट घडवून गौण खनिजांचे उत्खनन करणे ही बाब अत्यंत गंभीर असून या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येईल असेही यावेळी बनसोडे यांनी सांगितले.
या पाहणीदरम्यान संबंधित समितीने सदर गावे इको सेन्सिटिव्हिटी झोन (पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र), बफर झोनमध्ये येत आहे का हेसुद्धा तपासणे आवश्यक आहे. या प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या नियमांची पूर्तता करण्यात आली आहे का हे तपासून याबाबत अहवालात नमूद करण्यात यावे अशा सूचनाही बनसोडे यांनी या बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.