खा. गोडसे यांचा अनोखा उपक्रम; बुधवारी प्रायोगिक तत्त्वावर प्रांरभ
नाशिक : शहरासह संपूर्ण जिल्हाभरात कोरोना संसर्ग आजाराचे थैमान घातले असून दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या ही चिंताजनक आहे. शहरातील प्रमुख रहदारीच्या रस्त्यांवर सॅनिटायझर फवारणी करणे गरजेचे आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या संकल्पनेतून उद्या बुधवारी (दि.१२) मेनरोडवरील संत गाडगेबाबा पुतळ्यापासून ते रविवार कारंजा पर्यंन्त ड्रोनद्वारे सॅनिटायझर फवारणी करण्यात येणार आहे.
नाशिक शहरातील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. शहरातील प्रमुख भागात ज्या भागात रुग्णसंख्येचा विस्पोट होत आहे, शहरात खासदार गोडसे यांच्या संकल्पनेतून ड्रोनद्वारे सॅनिटायझर फवारणी करण्यात येणार आहे. ड्रोनद्वारे फवारणी करण्यासंदर्भात खा. गोडसे यांनी गेल्या पंधरवाड्यात बंगलोर येथील गरुडा ऐरोस्पेसचे मुख्य अधिकारी अग्निश्वर जयप्रकाश यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी नाशिक शहरात ड्रोनद्वारे सॅनिटायझर फवारणी करण्यास तयारी दर्शविली आहे. या ड्रोनद्वारे उद्या बुधवारी (दि.१२) संत गाडगे महाराज पुतळ्यापासून ते रविवार कारंजा पर्यन्तच्या परिसरात या ड्रोनद्वारे सॅनिटायझरची फवारणी करण्यात येणार आहे. या ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात येणार असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिने अधिकाधिक काळजी घेण्यात येणार आहे. याशिवाय शहरात लागू करण्यात आलेल्या दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊन काळात प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन खा. गोडसे यांनी केले आहे. शहरातील प्रमुख भागात सॅनिटायझर फवारणीसाठी कंपनीचे कुशल कर्मचारी बंगलोर येथून नाशिक शहरात दाखल झाले असून प्रायोगिक तत्त्वावर या सॅनिटायझर फवारणी करण्यात येणार आहे.