सांगली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘गाव करील ते राव काय करील!’ असे म्हटले जाते. याचाच अर्थ गावाने ठरवले तर कोणतेही चांगले, विकासात्मक काम होऊ शकते, म्हणजे एकीचे बळ तिथे कामी येते. एखादा व्यक्ती, पुढारी, राव किंवा रावसाहेब, गावचा पाटील, सरपंच एकट्याने काहीही करू शकत नाही, असा या म्हणी मागील अर्थ आहे. महाराष्ट्रात अशी अनेक गावे आहेत की, त्या गावातील ग्रामस्थ तथा गावकऱ्यांनी एकोप्याने तथा एकजुटीने एकत्र येत आपल्या गावाला आदर्श गाव तथा आगळीवेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. अर्थात यामध्ये त्या गावातील पुढारी तथा गावातील प्रमुखाचाही त्यामध्ये वाटा आहे.
अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी आणि पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार या गावांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. मात्र त्याचप्रमाणे राज्यातील अन्य प्रांत तथा विभागातही अनेक गावांनी असाच विकास करून राज्याच्या नकाशावर आपले नाव कोरले आहे. एक मात्र खरे की, एकटा व्यक्ती काहीही करू शकत नाही त्यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य आवश्यकच ठरते. मात्र काही ठिकाणी गाव प्रमुखाचे नेतृत्व तसेच सकारात्मक काम उठून दिसते याचा प्रत्यय सांगली जिल्ह्यात आला. गावात एका गावातील सरपंचाने चक्क आपल्या शेतातील विहिरीतून गावासाठी सहा महिन्यापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी स्वखर्चाने पाईपलाईन करून दिली, त्यांनीआपल्या शेताला पिकाला पाणी देण्याऐवजी त्याने गावकऱ्यांची तहान भागविली याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पाणी देण्याचे ठरवले
सांगलीतील काही तालुक्यांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस झाला नाही त्यामुळे नदी तलाव धरणे यांना पाणीसाठा पुरेसा नाही साहजिकच अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते त्यात रेवणगावचा ही समावेश आहे, या गावात पाणीटंचाईचे संकट असताना गावचे सरपंच सचिन मुळीक यांनी आपल्या शेतातील बोअरवेलचे पाणी शेततळ्याच्या माध्यमातून गावाला देण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी सुमारे १ लाख रुपये खर्च करून शेतापासून गावापर्यंत स्वखर्चाने पाईपलाइन केली असून स्वत:ची शेत जमीन पडीक ठेवत गावाला स्वखर्चाने पाईपलाईन टाकत पाणीपुरवठा केला आहे. सरपंच मुळीक हे दिलदारपणे सध्या गावची सहा महिन्यापासून तहान भागवत आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा खऱ्या अर्थाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सरपंचाने स्वतःची शेती जमिन पडीक ठेवली. त्यांच्या शेतातील उभी पिके सुकून गेली आहेत. त्यामुळे गावकरी आमचा सरपंच हा खऱ्या अर्थाने गावची काळजी घेणारा सरपंच असल्याच्या भावना व्यक्त करत आहेत.
महिलांची पाण्यासाठी वणवण
पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावोगावी पाणी टंचाई निर्माण झाली असून रेवणगावात पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर गावाला पाणी कुठून उपलब्ध करून द्यायचे असा प्रश्न उभा राहिला होता. रेवणगाव हे खानापूर तालुक्यात घाटमाथ्यावरील सुमारे १४०० लोकसंख्या असलेले गाव आहे. गावाला फेब्रुवारी महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जाणवू लागला. गावासाठी शासनाची जलजीवनमिशनची योजना होती, मात्र ती अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्येच शासनाकडे टँकरची मागणी करणे शक्य नव्हते, तेव्हागावचे सरपंच सचिन मुळीक आपल्या चार एकर शेतातील पिकांना बोअरवेलचे पाणी शेत तळ्यात टाकून देत होते.
स्वतः केला खर्च
गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मुळीक यांनी मार्च महिन्यापासूनच शेतीला पाणी न देता आता गावाला पाणी देण्याचा निर्णय घेतला. यासाठी शेततळ्यापासून ते गावच्या पाण्याच्या टाकी पर्यंत सरपंचाने लाखभर खर्च करून पाइपलाइन देखील केली. आज दिवसाला ७० हजार लिटर पाणी ते स्वतःची जमीन पडीक ठेऊन देत आहेत. तेव्हा टँकर सुरू झाला असता तरीही घरी पाणी हे बहुतांश वेळा महिलांनाच आणावे लागले असते. त्यामुळे सरपंचानी पाणी दिल्यामुळे वणवण करून पाणी आणण्याचा त्रास कमी झाला असल्याची भावना गावातील महिलांनी व्यक्त केली आहे.
Sangli Revangaon Sarpanch Ideal Work for Village
Sachin Mulik Water Issue Pipeline