सांगली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून सहकारी महिला पोलिसवर अत्याचार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सांगली येथील या घटनेने पोलिस विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे.
समाजातील वाईट वृत्तींना नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. पण, बरेचदा पोलिसंच वेगवेगळ्या स्वरूपातील गुन्ह्यांमध्ये अडकत असल्याचे चित्र आहे. सांगली येथील अशाच घटनेने पोलिसांची प्रतिमा खराब झाली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलिसाशी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर महिला पोलिसाचा गर्भपातही केला. या घटनेनं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सांगली पोलीस दलातील बँड पथकातील संशयित वसीम ऐनापुरेला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिला सांगली पोलीस दलात कार्यरत आहे.
सांगली पोलीस बँड पथकातील वसीम ऐनापुरेसोबत तिची ओळख होती. महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार करून धमकी देणाऱ्या ऐनापुरेविरोधात फिर्याद दाखल होताच त्याला अटक करण्यात आली. यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वसिमच्या वडिलांनासुद्धा अटक करण्यात आली आहे. वसीमने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून ओळख वाढविली. त्यानंतर वसिम याने पीडितेवर 4 मार्चपासून 6 जुलैपर्यंत सिंधुदूर्ग, अंकली, सांगलीतील वारणाली आणि अष्टविनायकनगर आदी ठिकाणी नेत तिच्या इच्छेविरुद्ध आणि जबरदस्तीने बलात्कार केला.
यामध्ये पीडित पोलीस महिला गर्भवती राहिली. पीडिता गर्भवती असल्याचे समजल्यानंतर संशयित वसीमने तिचा गर्भपात करण्यासाठी जबरदस्तीने गोळ्या खायला घातल्या. त्यानंतर पीडितेने तक्रार करू नये यासाठी वसीमच्या वडिलांनी पीडितेच्या भावाला फोनवरुन धमकी देखील दिली असल्याची तक्रार पीडित पोलीस कर्मचारी महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांचा अधिक तपास करत आहेत.