मिरज (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांमध्ये मिरजमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहेत. कधी खून तर कधी दरोडा यांच्यासारख्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी सांगलीमधील मिरज शहर परिसरात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचे दागिने, रोकड, संगणक असा ६ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींकडून मिरज शहरातील ६ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचवेळी दुसऱ्या एका घटनेत चोरट्याने चक्क रुग्णालयात आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पलायन केले मात्र दुचाकीवरून जाताना अपघात झाल्याने या दोघांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.
दुचाकी देखील चोरली
मिरजमध्ये रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरुन भरधाव वेगाने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांचा अपघात झाला अन् दोघे पोलिसांच्या जाळ्यात सापडले. अकलूजमधील नबी अली गरीब हुसेन इराणी आणि कर्नाटकातील दावणगिरी येथील जोहर अब्बास मोहसीन खान या दोघांना अटक केली आहे. कारण एका रुग्णालयात संगीता बंडगर ही महिला उपचारासाठी आल्या होत्या. त्या त्यांच्या पती समवेत चालत जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राला हिसका मारुन भरधाव वेगाने पोबारा केला. मात्र दुचाकीवरील दोघे चोरटे मिरज ते तासगाव रस्त्याने जात असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. ती दुचाकी देखील चोरलेली होती.
पाच दिवस पोलीस कोठडी
चोरट्यांचा सीसीटीव्हीच्या आधारे तपास करणाऱ्या महात्मा गांधी चौक पोलिसांना मिरजेतून दागिने चोरुन पोबारा केलेल्या चोरट्यांचा अपघात झाला असून त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली. महात्मा गांधी चौक पोलिसांनी तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात जाऊन दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे लंपास केलेले मंगळसूत्र आढळून आले आहे. तसंच त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील कर्नाटकातून चोरल्याचे कबुली दिले आहे. दोघांकडून पोलिसांनी मोटरसायकलसह एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी दिली आहे. मात्र या घटनेची आता गेल्या दोन दिवसापासून जोरदार चर्चा सुरू आहे