नाशिक – तरंगिणी प्रतिष्ठान, मुंबई आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे गुरुवार दि. १४ आणि शुक्रवार दि १५ एप्रिल रोजी श्यामरंग संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले असून नामवंत युवा आणि ज्येष्ठ कलाकार आपले गायन सादर करणार आहेत. प्रसिद्ध गायक संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतीनिमित्त कुसुमाग्रज स्मारक येथे रोज सायं. ६ वा. होणाऱ्या या कार्यक्रमात गुरुवार दि. १४ रोजी सत्यजित बेडेकर(पुणे) गायन सादर करणार आहेत, त्यानंतर नाशिकच्या ईश्वरी आणि सुरश्री दसककर संवादिनी वादन सादर करणार आहेत तर पं. अभिषेकी यांचे आणि पं. राजन साजन मिश्रा यांचे ज्येष्ठ शिष्य मोहनकुमार दरेकर गायन सादर करणार आहेत .
शुक्रवार दि. १५ एप्रिल रोजी युवा गायिका रागिणी देवळे ( उज्जैन ) यांच्या गायनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्यानंतर विख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या गुरुकुलात शिक्षण घेणारी युवा कलावंत वैष्णवी जोशी हिचे बासरीवादन होणार आहे तर समारोहाची सांगता प्रसिद्ध गायक पं. शौनक अभिषेकी यांच्या गायनाने होणार आहे. कार्यक्रमास सुभाष दसककर, ईश्वरी दसककर संवादिनी ची साथ करणार असून तबल्यावर नितीन वारे, नितीन पवार, रसिक कुलकर्णी, सुजित काळे, कल्याण पांडे हे साथसंगत करणार आहेत तर कार्यक्रमाचे निवेदन आनंद क्षेमकल्याणी करतील. श्यामरंग संगीत समारोहाचे हे २० वे वर्ष असून कोरोना नियमावली मुळे मागील वर्षी समारोह होऊ शकला नव्हता. रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे