नाशिक – शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागाच्या वतीने शनिवार दिनांक १८ डिसेंबर व रविवार दिनांक १९ डिसेंबर रोजी ‘कुर्तकोटी संगीत महोत्सव -२०२१’ चे आयोजन करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून यशस्वीपणे सुरू असलेला हा संगीत महोत्सव कोवीड मुळे गेल्यावर्षी होऊ शकला नाही. शंकराचार्य न्यासाच्या डॉ कुर्तकोटी सभागृहात यावर्षी पुन्हा स्वरोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक दर्जाच्या कलाकारांनी सादर केलेल्या कलेचा आस्वाद या संगीत महोत्सवात रसिकांना घेता येतो. शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभाग, नाशिक या संस्थेने कायमच दर्जेदार कलाकारांना एका संगीत महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आणत रसिकांना सर्वांगीण श्रवणानंद देण्याचा प्रयत्न केला आहे. तरुण व प्रथितयश कलाकार अशा दोन्ही प्रकारच्या कलाकारांचा समावेश या महोत्सवाचं वैशिष्ट्य ठरलं आहे.
कुर्तकोटी संगीत महोत्सवात या वर्षी, १८ डिसेंबर सायं ६ ते ९ च्या पहिल्या सत्राची सुरवात, ग्वाल्हेर घराण्यातील पं. डॉ वीणा सहस्रबुद्धे यांच्या शिष्या चिन्मयी आठल्ये, या आपल्या गायनने करणार आहेत. त्यांना तबल्यावर श्री.प्रणव गुरव व हार्मोनियम वर श्री. आशिष कुलकर्णी साथ करणार आहेत. या सत्रातील दुसरे कलाकार, संगीत नाटक अकादमी पारितोषिक प्राप्त ख्यातनाम पं. पुष्पराज कोष्टीं यांचे सुरबहारवर धृपद शैलीतील सादरीकरण असून त्यांना पखवाज वर श्री. विवेकानंद कुरंगळे साथ करणार आहेत.
१९ डिसेंबर सकाळी ९ ते १२ दुसऱ्या सत्रात , श्री. मानसकुमार यांचे व्हायोलिन वादन असून त्यांना तबल्यावर श्री. तनय रेगे साथ करतील. मानसकुमार ह्यांनी गुवाहाटी येथील पं. विद्युत मिश्रांकडे तब्बल १८ वर्ष व्हायोलिन वादनाचे प्रशिक्षण घेतलेले. याच सत्रात नंतर पं. सी. र. व्यास यांचे शिष्य श्री. संजीव चिमलगी हे आपले शास्त्रीय गायन सादर करणार आहेत. त्यांना तबल्यावर श्री. विश्वनाथ शिरोडकर व हार्मोनियमवर सौ. सीमा शिरोडकर साथ करतील .
सायंकाळी – ६ ते ९, हिंदुस्थानी रागदारी व संगीताचा वारसा जागतिक पातळीवर नेणारे कलाकार भारतरत्न पं. रविशंकर यांचे शिष्य पं.पारथो सारथी यांच्या सरोदवादनाने ह्या संगीत महोत्सवाचा समारोप होणार आहे. त्यांना तबल्यावर श्री. आशिष पॉल करणार साथ आहेत.
कोवीडसंबंधी सगळे निर्बंध पाळून नियमानुसार रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा महोत्सव संपन्न होणार आहे. शंकराचार्य न्यासाच्या यू ट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वर या उत्सवाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. रसिकांनी ह्या स्वर पर्वणीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शंकराचार्य न्यासाच्या फेसबुक पेज आणि यू ट्यूब चॅनल ची लिंक आणि क्यू आर कोड सोबत दिला आहे.