संगमनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मातब्बर उमेदवाराला पराभूत करून अमोल खताळ हा जायंट किलर ठरला असला तरीही खरे जायंट किलर हे माझे लाडके बहिण, भाऊ आणि शेतकरी आहेत. राज्यातील वारकरी संप्रदायाला हजारो वर्षापासूनची परंपरा आहे. त्यांच्यावर हल्ले करण्याचे पाप जर कुणी करत असेल तर ते कदापि खपवून घेतले जाणार नाही. हे सरकार वारकरी संप्रदायाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट नाव न घेता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना इशारा दिला.
अगोदर रॅली व नंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या भव्य आभार सभेला संबोधित करताना विधानसभा निवडणुकीत दाखवलेल्या विश्वासाबद्दल संगमनेरकरांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर आभार मानले. ते पुढे म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही चमत्कार घडवलात आणि ४० वर्षांची मक्तेदारी उलटवून लावत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकावला त्याबद्दल तुमचे आभार मानायला आलो आहे असे याप्रसंगी सांगितले. यावेळी आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, शिवसेना प्रवक्ते संजीव भोर-पाटील तसेच शिवसेना स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक आणि संगमनेरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी त्यांनी मतांच्या चोरीबद्दलही वक्तव्य केले. ते म्हणाले की, सध्या मतांची चोरी झाल्याचे गळे विरोधकांकडून काढले जात आहेत. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्याचे प्रयत्न काही जण करत आहेत. मात्र जेव्हा लोकसभेत तुमचे उमेदवार जास्त निवडून आले, तेव्हा तुम्ही हे आक्षेप का घेतले नाहीत असा सवाल याप्रसंगी केला. तुम्ही आरोपांचे राजकारण केलेत तरी त्याला आम्ही कामातून उत्तर देऊ.