संगमनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील घारगाव जवळ अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. आजवर केवळ मानवी वस्तीत बिबट्या येत होता. मात्र, आता बिबट्याने एका घरात घुसून माणसावर हल्ला केला. ही व्यक्ती टीव्ही पाहत होती. त्याचवेळी अचानकपणे बिबट्याने हल्ला केला आहे. या घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मात्र, या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, वडदरा (बोटा) येथील उत्तम बाळाजी कुऱ्हाडे (६२ ) या इसमावर घरात घुसून बिबट्याने हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यूू झाला. ही घटना रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. पठार भागात बिबट्याचे मानव वस्तीवर येण्याचे प्रमाण वाढले आहे. वडदरा येथे वास्तव्यास असलेले उत्तम कुऱ्हाडे घरात टीव्ही पाहत होते. घराचा दरवाजा उघडा असल्याने परिसरातच दबा धरून बसलेल्या बिबट्याने काही कळायच्या आत त्यांच्यावर घरात घुसून हल्ला चढविला.
मानवी वस्तीत येऊन बिबट्या अनेकांवर हल्ला करण्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो. अलीकडच्या काळात अशा अनेक घटना घडल्याच्या दिसून येतात विशेषतः नाशिक, नगर आणि जिल्ह्यात अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसते. बिबट्या हा अत्यंत घातक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. गर्द झाडीमध्येही तो अचूक हल्ला करण्याची क्षमता ठेवतो. भक्ष्य कितीही उंचावर असले तरी देखील तो अगदी सहज गतीने उड्या मारत वर चढतो. असा खतरनाक प्राणी जर मानवी वस्तीत घुसला तर काय होईल?
बिबट्याने केलेला हा हल्ला इतका भयानक होता की मानेचा घोट चावा घेत त्यांना जागीच ठार केले. त्यांच्या आईने जोरजोरात आरडाओरड केल्याने मृतदेह टाकून बिबट्याने पळ काढला. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. दरम्यान , वनरक्षक, वनसेवक यांनी घटनास्थळी पोहचून त्यांनी या घटनेची माहिती घेतली. मृतदेह तपासणीसाठी संगमनेर येथील रुग्णालयात पाठविण्यात आला. बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात वारंवार बिबट्याचे हल्ल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला बिबट्याचा वावर आता मोठ्या प्रमाणात वाढला असून बिबटे माणसांवरही हल्ले करु लागले असल्याने वनविभागाने गावोगावी पिंजरे लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागील वर्षी मे महिन्यात मुंबईत अशाच प्रकारची घटना घडली होती. माणसाच्या रक्ताला चटावलेल्या एका बिबट्याने मुंबईतील गोरेगाव येथील आरे परिसरात एका मध्यमवयीन महिलेवर जीवघेणा हल्ला चढवला होता. याच हल्ल्याचा अतिशय धक्कादायक व्हीडिओ आता समोर आला होता. महिला आणि बिबट्यामधील झटापटीचा हा व्हीडिओ अंगावर शहारे आणणारा होता.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्ली परिसरात देखील अशाच प्रकारची अत्यंत भयानक घटना घडली होती. एका पिसळलेल्या बिबट्यानं तब्बल १३ लोकांवर हल्ला केला होता. समोर येणाऱ्या प्रत्येकाला हा बिबट्या जखमी करत होता, अगदी रस्त्यावर पळणाऱ्या गाड्यांवर देखील तो चढत होता. एक बिबट्या चुकून जंगलातून बाहेर पडून मानवी वस्तीत आल्याचे व्हिडिओ वायरल झाले होते. नाशिक जिल्ह्यात देखील अशा प्रकारच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या दिसून येतात.
Sangamner Leopard Killed man Watching TV at Home