संगमनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी एकेकाळचे काँग्रेस पक्षातील त्यांचे सहकारी राधाकृष्ण विखे-पाटील यांचा संगमनेर बाजार समितीच्या निवडणुकीत सपशेल पराभव केला आहे. बाळासाहेब थोरात यांनी ही निवडणुक एकतर्फी जिंकली असून राज्याच्या राजकारणात त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत थोरात आणि विखे-पाटील आमनेसामने असल्यामुळे ही निवडणुक प्रतिष्ठेची मानली जात होती. अनेक ठिकाणी बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये अनपेक्षित युती झाल्यामुळे तेथील निकालाकडे सर्वांचे लक्ष होतेच. तर संगमनेरमध्ये थोरात आणि विखे-पाटील यांच्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत विखे-पाटील गटाला एकही जागा जिंकता आलेली नाही. थोरात गटाने सर्व १८ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
अनेक वर्षे याठिकाणी थोरात यांचेच वर्चस्व आहे, तरीही विखे-पाटलांनी त्यांना आव्हान दिले होते. त्याुळे अधिकच उत्सुकता ताणली गेली होती. दुपारी अडिचच्या सुमारास निकाल आला तेव्हा संगमनेर येथील जनता थोरात यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट झाले. बाजार समितीवर थोरात गटाचा झेंडा फडकताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मतमोजणीदरम्यान एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळविला होता. त्यामुळे पुढील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर थोरात यांनी एकहाती विजय प्राप्त केला.
काँग्रेस नव्हे थोरात
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपावरून बाळासाहेब थोरात पक्षावर नाराज झाले होते. त्यावेळी त्यांनी सत्यजित तांबे यांना सहकार्य केल्याचे बोलले जाते. तांबे यांनी विजयही प्राप्त केला. त्यानंतर थोरात पक्षाला सोडचिठ्ठी देतील अश्या प्रकारचे वातावरण तयार झाले होते. पण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत थोरात यांनी आपला जलवा दाखवला आणि स्वतःचे वेगळे वलय सिद्ध केले.
Sangamner APMC Election Politics Balasaheb Thorat Radhakrushna Vikhe Patil