सांगली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मंत्री, शिक्षणमहर्षी स्व. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ या स्मारकाचे लोकार्पण व पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा गुरुवारी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांच्या शुभहस्ते वांगी येथे संपन्न झाला. अनावरण सोहळा पार पडल्यानंतर कडेगांव येथे विशाल जाहीर सभा पार पाडली.
यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभेला संबोधित करताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागितली पण ही माफी त्यांनी पुतळ्याचे काम आरएसएसच्या व्यक्तीला दिले, त्यात भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली का? असा सवाल विचारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे असे म्हणाले. शेतकरी आंदोलनात ७०० शेतकरी शहीद झाले, नोटबंदीमुळे लघु, छोटे, मध्यम उद्योग संपवले व लाखो लोकांचे रोजगार घालवले, चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावला त्याबद्दलही माफी मागा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी म्हणाले की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मजबूत आहे, त्याला कोणीही हलवू शकत नाही. तीन पक्ष मिळून चांगले काम करत आहोत. राहुल गांधी यांनी ‘डरो मत’चा संदेश दिला आहे, न घाबरता काम करा. भाजपा युती सरकार गुजरातच्या इशा-यावर काम करत आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमानी मोदींकडे गहाण ठेवू नका. लोकसभेप्रमाणेच भरघोस पाठिंबा देत विधानसभेला मविआचे सरकार आणा.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष श्री. शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी श्री. रमेश चेन्नीथला जी,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. मुकुलजी वासनिक, विधिमंडळ पक्षनेते आ. श्री. बाळासाहेब थोरात, राज्याचे विरोधी पक्षनेते आ. श्री. विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे, आ. श्री. पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे गटनेते आ. श्री. सतेज पाटील, CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष श्री. नसीम खान, खा. श्री. शाहू महाराज, खा. कु. प्रणिती शिंदे, खा. श्री. विशाल पाटील, आ. डॉ. श्री. विश्वजीत कदम, माजी मंत्री आ. श्री. नितीन राऊत, आ. श्रीमती यशोमती ठाकूर, गोवा दिव दमनचे प्रभारी श्री. माणिकराव ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन श्री. नाना गावंडे, माजी आमदार श्री. मोहनदादा कदम, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. श्री. विक्रम सावंत, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील आणि सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.