मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मंत्री व भाजपचे नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी वाशी येथील निर्धार मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात २५ माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासह प्रवेश केला. त्यांना बेलापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. पण, भाजपने विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना पुन्हा संधी दिल्यामुळे ते नाराज आहे.
रविवारी भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात गणेश नाईक यांना एेरोली मतदार संघातून उमेदवारी दिली. पण, बेलापूरची जागा दिली नाही. त्यामुळे संदीप नाईक नाराज असून त्यांनी वेगळी वाट निवडण्याचा निर्णय घेतला.
२०१४ मध्ये मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा पराभव केला होता. वडीलांचा हा बदला घेण्यासाठी संदीप नाईक हे मैदानात उतरले आहे. वाशी येथे मोठा मेळावा घेऊन त्यांनी हा पक्षप्रवेश केला. आता गणेश नाईक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षप्रवेश घेतांना त्यांनी भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला. या पत्रात त्यांनी भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.