सुरगाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुजरात सीमेलगत असलेल्या तालुक्यातील रानपाडा येथे ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचेसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन बाऱ्हे येथील जनलक्ष्मी आदिवासी विकास संस्था आणि नाम फाऊंडेशन यांच्या प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना नामदार झिरवाळ म्हणाले की आदिवासी समाजात वर्षानुवर्षे गरिबी आहे. पावसाळ्यात काम संपले की कामाच्या शोधात बाहेरगावी जावे लागते. कुटुंबाच्या पालनपोषणासाठी घरदार सोडावे लागते. शहरात विवाह सोहळ्यात लाखो रुपये खर्च केले जातात. तेवढ्याच पैशात हजारो जोडप्यांचे विवाह पार पडतील या उद्देशाने लक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्था बा-हे तसेच नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रानपाडा येथे ५१ जोडप्यांचा विवाह सोहळा आयोजित केला आहे.
मोठा खर्च वाचवायचा असेल तर सामुदायिक विवाह सोहळा शिवाय पर्याय नाही. तसेच आदिवासी समाजात बालविवाह करणे चुकीचे आहे. लहान वयात लग्न होतात व परिणामी कुपोषणाचे प्रमाण वाढते. म्हणून भविष्यात आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी मुलींच्या वयाच्या सातव्या वर्षी शासनातर्फे वीस हजार रुपये जमा करायचे व त्यानंतर मुलगी दहावीला गेली की पुन्हा पाच हजार रुपये व बारावीला गेल्यावर पुन्हा पाच हजार रुपये तिच्या खात्यावर शासनातर्फे जमा करायचे. ही रक्कम तिच्या लग्नासाठी कामी यावी या उद्देशाने लवकरच योजना जाहीर केली जाईल, अशी घोषणा झिरवळ यांनी केली.
तर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजित गावित म्हणाले की, आपला विकास आपणच करु शकतो, वैचारिक पातळीवर परिवर्तन घडवून आणले तरच सर्वांगाने विकास साध्य होईल असे सांगितले. यावेळी नाम फाउंडेशनचे मल्हार पाटेकर, गणेश थोरात, अस्मिता शेट्टी, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष रणजीत गावित, शिवसेना तालुकाप्रमुख मोहनराव गांगुर्डे, पंचायत समितीचे सदस्य एन.डी.गावित, युवानेते ऋषिकेश पवार, जेष्ठ नागरिक गोपाळ धूम, काशिनाथ वाघमारे, युवराज लोखंडे, राजु पवार, आदी प्रमुखपाहुणे होते. सामुदायिक विवाह सोहळ्याच्या यशस्वीपणे पार पडण्यासाठी स्थानिि व परिसरातील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.