पुणे – सॅमसंगच्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. सॅमसंगचे काही स्मार्टफोन लवकरच नव्या फोनसारखे होणार आहेत. कंपनीतर्फे लवकरच नवे अँड्रॉइड अपडेट जारी करण्यात येणार आहे. सॅमसंगतर्फे गेल्या महिन्यात फ्लॅगशिप गॅलेक्सी S21 सीरिजच्या स्मार्टफोनसाठी अँड्रॉइड १२ बिटा अपडेट कार्यान्वित करण्यात आले होते. कंपनी आता आपल्या S21 सीरिजसाठी ऑपरेटिंग सिस्टिमच्या स्टेबल अपडेटचे अनावरण करण्यास पूर्णपणे सज्ज झाली आहे. याचाच अर्थ असा होतो की सॅमसंग गॅलेक्सी S21, गॅलेक्सी S21+ आणि गॅलेक्सी S21 अल्ट्राचे युजर्स लवकरच आपल्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड १२ चा अनुभव घेऊ शकणार आहेत.
9to5Google या संकेतस्थळाला सॅमसंगच्या एका कर्मचार्याने माहिती दिली की, कंपनीकडून गॅलेक्सी S21 कुटुंबासाठी अँड्रॉइड १२ बिटाचे स्टेबल अपडेट जारी करण्यात येणार आहे. कंपनीच्या गॅलेक्सी S21 वर पाचव्या अँड्रॉइड बिटाचे अनावरण करण्याची कोणतेही नियोजन नाही, असे कोरियामधील सॅमसंगच्या फोरमवर बिटा ऑपरेशनच्या व्यवस्थापकाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे कंपनीने आपल्या उपकरणांवर अँड्रॉइड १२ ऑपरेटिंग सिस्टिमला कार्यान्वित करण्याकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. त्यासोबतच चौथ्या बिटामध्ये आढळलेल्या काही बग्जना कंपनीतर्फे हटविण्यात येणार आहे.
नव्या अपडेटमध्ये हे
अँड्रॉइड १२ च्या अपडेटसह सॅमसंग स्मार्टफोन्सना नव्या सॅमसंग वन यूआय ४.० चेही अपडेट मिळणार आहे. वन यूआय ४.० सोबत युजर्सना चांगले स्टॉक अॅप, मटेरिअल यू डायनॅमिक कलर थिम, लॉक स्क्रीन विजेट, कॅमेरा, मायक्रोफोन अॅक्सेस आणि नव्या विजेट डिझाइनला बंद करण्यासाठी डेडिकेटेड क्विक सेटिंग्ज टॉगल मिळणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या अपडेटमुळे डिव्हाइसची सुरक्षा आणि गोपनीयता वाढणार आहे.
या देशात आधी मिळणार
वन यूआय ४.० बिटा प्रोग्राम नोव्हेंबर २०२१ च्या अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. अपडेट मिळणार्या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, चीन, जर्मनी, भारत आणि दक्षिण कोरिया या देशांचा समावेश आहे. नंतर इतर देशांमध्ये अपडेट मिळणार आहे.
असे करा अपडेट डाउनलोड
सर्वप्रथम तुम्हाला सॅमसंग फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर सिस्टिम अपडेट पर्यायावर स्क्रोल डाउन करावे लागेल. आता सिस्टिम अपडेटवर टॅप करा आणि तुम्हाला अपडेट मिळाले आहे का नाही हे तपासा. अपडेट मिळाले असेल तर डाउनलोड आणि इन्स्टॉलवर टॅप करा. अपडेट डाउनलोड करण्यापूर्वी कंपनीकडून बॅकअप घेण्याची सूचना दिली जाते.