शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने शिर्डी व नागपूर अशा दोन ठिकाणी टायर तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. समृध्दी महामार्गाच्या शिर्डी इंटरचेंज येथील टोलनाक्यावर ९ जून २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता परिवहन आयुक्तांच्या हस्ते टायर तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या टायर तपासणी केंद्राच्या माध्यमातून वाहनांची मोफत तपासणी केली जाणार आहे. या सुविधेचा जास्तीत वाहनधारकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन अहमदनगर उप प्रादेशिक परिवन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.
हिंदू ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा पहिला टप्पा शिर्डी ते नागपूर व दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर असा वाहतूकीसाठी सुरू झाला आहे. समृध्दी महामार्गावरील बहुतांशी अपघात वाहनांचे टायर फुटल्यामुळे होत आहेत. त्यामुळे अशा अपघातांना प्रतिबंध बसावा. यासाठी महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी सिएट लिमिटेड या टायर उत्पादक कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांच्या टायर तपासणीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
महामार्गावर वाहन चालवितांना टायर योग्य गुणवत्तचे, वेग मर्यादेचे व सुस्थितीत असणे आवश्यक आहे. वाहनधारकांना सुरक्षित प्रवार करता यावा. या उद्देशाने टायर तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमात वाहनधारकांना नायट्रोजन भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, वॉल्व तपासणी, वॉल्व पिन चेक व रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर दुरूस्ती, टायर वेअर चेक यंत्राचे वितरण या टायर तपासणी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. असे ही श्रीमती पवार यांनी सांगितले .
Samruddhi Mahamarga Vehicle Safety Centre Shirdi