नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर तालुक्यातील आगासखिंड शिवारात समृध्दी महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटलेली कार सुमारे ३५ फूट उंच असलेल्या पुलाच्या कठड्यावरुन कोसळल्याची घटना घडली. या अपघातात सनरीस गोयल (५३), हेमीना गोयल (४८) व दिव्या गोयल(२४) सर्व रा. घनसोली, नवीमुंबई हे तीघे जखमी झाले. त्यांना एसएमबीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.
या अपघाता बाबत मिळालेली माहिती अशी की, नवी मुंबई घनसोली येथील गोयल कुंटुबातील तिघे स्विफ्ट कारने घोटीकडून शिर्डीकडे जात असतांना हा अपघात झाला. आगासखिंड शिवारात असलेल्या अंडरपासच्या पुलाजवळ दोन्ही लेनच्या मधोमध असलेल्या ब्रीजच्या संरक्षक कठड्याला कारने धडक दिली. त्यानंतर कार खालून जाणाऱ्या शिवार रस्त्यावर कोसळली. ही घटना महामार्गाच्या कामावर असलेल्या काही जणांनी हा अपघात बघितला. त्यानंतर त्यांनी टोलनाक्यावर अपघाताची माहिती दिली. त्यानंतर महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
असा झाला अपघात
गोयल कुटुंबिय भरवीर येथील समृध्दी महामार्गाच्या टोल प्लाझाने एन्ट्री करुन ते समृध्दी महामार्गाने शिर्डीच्या दिशेने निघाले होते. कार आगासखिंड शिवारात आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर हा अपघात झाला.