मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समृद्ध महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात महाभीषण अपघात झाला आहे. खासगी ट्रॅव्हल्स बसमधील २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यानिमित्ताने या महामार्गावरील अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
राज ठाकरे म्हणाले
बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल बसला झालेल्या अपघाताची दुर्घटना अतिशय भीषण आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. महामार्गांवर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खाजगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचे ड्रायव्हर्स आणि ट्र्क ड्रायव्हर तर कमालीच्या बेदरकारीने गाड्या चालवतात. ह्यांच्यावर चाप बसवायलाच हवा. अशा अपघातांच्या घटना परत कधीच होणार नाहीत ह्यासाठी आता प्रयत्न व्हायलाच हवेत.
उद्धव ठाकरे म्हणाले
बुलढाणा येथे समृध्दी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे वृत्त मन हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरुच आहेत. आतापर्यंत ३०० हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रध्दांजली अर्पण करतो.
आदित्य ठाकरे म्हणाले
नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात २५ प्रवाशांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सुन्न करणारी आहे. मृत प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती. समृद्धी महामार्गावर वाढते अपघात रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.