इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिलाच टप्पा सुरू झाला असून याद्वारे सरकारला मोठ्या प्रमाणात करवसुली होत आहे. मागील दोन महिन्यांचा विचार करता या मार्गाने पावणेनऊ लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीए) ६२ कोटींचा टोल मिळाला आहे.
मुंबई ते नागपूर अशा ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीच्या महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ ला नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. लोकार्पणानंतर लगेचच यावरून वाहने धावू लागली असून समृद्धीवरून प्रवास करण्यासाठी प्रवासी/वाहनचालकांना टोल भरावा लागतो आहे. ५२० किमीच्या महामार्गावर १९ ठिकाणी टोल नाके असून ५२० किमीच्या प्रवासासाठी वाहनचालक / प्रवाशांना ९०० रुपये टोल भरावा लागतो आहे. ‘जितका प्रवास तितका टोल’ या नियमानुसार टोलवसुली करण्यात येत आहे. त्यानुसार या टप्प्यात १९ छेदमार्ग असून ज्या छेदमार्गावर वाहन उतरेल, तितक्या किमीसाठी टोल वसूल करण्यात येत आहे.
एमएसआरडीएचा दावा
लोकार्पणापासून म्हणजे ११ डिसेंबर ते २० फेब्रुवारीदरम्यान समृद्धीवरून ८ लाख ७९ हजार ०५८ वाहनांनी प्रवास केला आहे. डिसेंबरमध्ये (२१ दिवस) २ लाख २० हजार ९०३ जणांनी, जानेवारीत (३१ दिवस) ४ लाख ०४ हजार ३०२ जणांनी तर फेब्रुवारीत २० फेब्रुवारीपर्यंत (२० दिवस) २ लाख ५३ हजार ८५३ वाहनांनी समृद्धीवरून प्रवास केला आहे.
अशी झाली वसुली
११ डिसेंबर २०२२ ते २० फेब्रुवारी २०२३ दरम्यान ६२ कोटी ०८ लाख ४३ हजार १०९ रुपये इतका टोल वसूल झाला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये १३ कोटी २० लाख ५१ हजार ३६१ रुपये, जानेवारी २०२३ मध्ये २७ कोटी ७४ लाख ११ हजार ९६८ रुपये तर फेब्रुवारी २०२३ मध्ये (२० फेब्रुवारीपर्यंत) २१ कोटी १३ लाख ७९ हजार ७८० रुपये अशी टोलवसुली झाली आहे.
Samruddhi Highway Toll Collection Nagpur to Shirdi