बुलडाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अपघात सत्र अनुभवणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघात होणार नाही, असा दावा करणाऱ्या एका भोंदूबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्यामुळे या भोंदुबाबाचे पितळ उघडे पडले आहे.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास मार्ग दिंडोरी प्रणित मार्गाच्या वतीने भविष्यात समृद्धी महामार्गावर अपघात होऊ नये यासाठी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करुन घटनास्थळी सव्वा कोटी महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यात आला. या उपक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला. दरम्यान पूजा केल्याने अपघात होणार नसल्याचा दावा करणाऱ्या एका युवकाच्या विराेधात सिंदखेड राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. समृद्धी महामार्गावर सातत्त्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. हा माहामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत 950 हून अधिक छोटे मोठे अपघात झाले आहेत. परंतु सर्वाधिक अपघात हे बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गावर झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या महारार्गावर अपघाताच्या ठिकाणी स्वामी समर्थ भक्तांनी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करून सव्वा कोटी महामृत्युंजय मंत्राचाही जप करण्यात आला.
लोकांना फसविणे गुन्हाच
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक डॉ हमीद दाभोलकर यांनी लोकांना फसवणे आणि ठकवणे हा जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. बुलढाणा पोलिस अधीक्षकांनी यावर तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त व्यक्त केली होती. त्यानंतर ही कारवाई झाल्याची माहिती आहे.
काय आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दावा?
डॉ. दाभोलकर म्हणाले गेल्या महिन्यात समृद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा इथे झालेल्या भीषण अपघातात अनेक लोकांचा जाळून मृत्यू झाला. त्या तिथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सिंदखेड राजा यांच्या मार्फत महामृत्युंजय यंत्र बसवण्यात आले आहे आणि या मुळे आजूबाजूच्या पाच दहा किलोमीटर मध्ये अपघात होणार नाही तसेच अपघात झाला तर मृत्यू होणार नाही असा दावा तिथल्या स्वामी समर्थ सेवा केंद्र समन्वयक यांनी केला आहे.