बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरू असताना आज पहाटे आतापर्यंतचा सर्वांत भयंकर अपघात झाला. एका खासगी ट्रॅव्हल्सने अपघातानंतर पेट घेतल्यामुळे तब्बल २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गेल्या काही वर्षांतील हा सर्वांत मोठा अपघात मानला जात आहे.
विदर्भ ट्रॅव्हल्सची बस शुक्रवारी ३० जूनला सायंकाळी ५ वाजता नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. समृद्धी महामार्गाने निघालेल्या या बसमध्ये नागपूर, वर्धा, यवतमाळ येथील प्रवासी बसले होते. ट्रॅव्हल्स बुलडाणा येथील सिंदखेडराजाच्या आसपास असताना उजव्या बाजुच्या डिव्हायडरवर आदळली. त्यानंतर ती डाव्या बाजुला पडली. डिझेलची टँक फुटल्याने डिझेल खाली गळू लागले आणि थोड्याच वेळात बसने पेट घेतला. या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते, त्यापैकी ८ प्रवाशांनी जीव वाचवला. पण २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये महिला, पुरुष व लहान मुलांचाही समावेश होता.
गाडीने पेट घेतल्यानंतर आसपासच्या गावातील लोकांनी धाव घेतली. अग्नीशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. बराच वेळ शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली गेली. पण तोपर्यंत बहुतांश प्रवाशांचा मृत्यू झालेला होता. प्रशासनाकडून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अद्याप प्रवाशांची यादी आणि मृतदेह तपासणे व नातेवाईकांचा संपर्क शोधून काढण्याचे काम सुरू आहे.
चालकाचा डोळा लागला होता?
विदर्भ ट्रॅव्हल्सची बस पुण्याच्या दिशेने निघाली असताना उजव्या बाजुच्या डिव्हायडरवर धडकली. चालकाचा डोळा लागल्यामुळे नियंत्रण सुटले व बस डिव्हायडरला धडकली, असा अंदाज व्यक्त होत आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
राज्यभरात हळहळ
या घटनेनंतर राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. विकासाच्या नावाखाली लोकांचे बळी घेतले जात आहे, असाही आरोप होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारने आतातरी समृद्धी महामार्गावरील त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले पाहिजे असे म्हणत घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.