इगतपुरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विविध कारणांमुळे चर्चेत असलेला समृद्धी महामार्ग आता पुन्हा चर्चेत आला आहे. अपघात आणि विविध कारणांमुळे या महामार्गाची चर्चा होते. आता मात्र, या महामार्गावर निर्माणाधीन पूल कोसळला आहे. ही दुर्घटना तालुक्यातील बेळगाव तऱ्हाळे येथे घडली आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.
नागपूर ते मुंबई असलेला समृद्धी महामार्ग दोन टप्प्यात साकारण्यात येत आहे. यातील पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी हा वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तर, शिर्डी ते मुंबई या महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. इगतपुरी तालुक्यातील बेळगाव तऱ्हाळे परिसरात सध्या समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. याठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. असे असताना हा उड्डाणपूल कोसळला आहे. मुख्य रस्त्यावर असलेला हा उड्डाणपुल कोसळल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. बेळगाव तऱ्हाळे ते गांगडवाडीला जोडणारा हा उड्डाणपूल आहे. तोच आता कोसळला आहे.
हा अपघात झाल्याने महामार्गाच्या कामकाजाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या सर्व बांधकामाचे ऑडिट करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे.
इगतपुरी तालुक्यात समृद्धी महामार्गावर निर्माणाधीन पुल कोसळला pic.twitter.com/8QDCzbO7JG
— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 9, 2023
Samruddhi Highway Construction Bridge Collapse