बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समृद्धी महामार्गावर देऊळगाव राजानजीक शनिवारी, दि. १ रोजी खासगी प्रवासी बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २५ जणांवर आज दि. २ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता हिंदू स्मशानभूमीत एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले. मंत्री गिरीष महाजन यांनी अग्नि दिला. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रामदास तडस, आमदार आकाश फुंडकर, श्वेता महाले, संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी सहमती दिल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले. यात तेजस पोकळे वर्धा, करण बुधबावरे वर्धा, वृषाली वनकर पुणे, शोभा वनकर पुणे, ओवी वनकर पुणे, ईशान गुप्ता नागपूर, सुजल सोनवणे यवतमाळ, तनिषा प्रशांत तायडे वर्धा, तेजस्विनी राऊत वर्धा, कैलास गंगावणे पुणे, कांचन गंगावणे पुणे, सई गंगावणे पुणे, संजीवनी शंकरराव गोटे वर्धा, सुशील खेलकर वर्धा, झोया शेख नागपूर, रिया सोमकुवर नागपूर, कौस्तुभ काळे नागपूर, राजश्री गांडोळे वर्धा, मनीषा बहाळे वाशिम, संजय बहाळे वाशिम, राधिका महेश खडसे वर्धा, श्रेया विवेक वंजारी वर्धा, प्रथमेश प्रशांत खोडे वर्धा, अवंती परिमल पोहणेकर वर्धा, निखिल पाते यवतमाळ यांच्यावर एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी मंत्री गिरीष महाजन यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. श्री. महाजन म्हणाले, घडलेली घटना अत्यंत दुर्देवी असून शब्दांमध्ये सांत्वन करता येणे शक्य नाही. आज दुःखाचा डोंगर कोसळला असताना नातेवाईकांनी संयम दाखवून दुःखाला सामोरे जात आहे. अपघातातील केवळ चार मृतदेहांची ओळख पटली आहे. मात्र 21 मृतदेहांची ओळख पटली नसल्याने सर्व नातेवाईकांनी सहमती दिली असल्याने एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती शासनातर्फे शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली. अंत्यसंस्कार करण्यात आलेल्यांच्या सर्व कुटुंबियांना अस्थी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या प्रथा परंपरेप्रमाणे या अस्थींचे विधिवत विसर्जन करावे. कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. यापुढे असे अपघात होणार नाहीत, यासाठी कडक कारवाई करण्यासोबतच कठोर पावले उचलण्यात येतील. यावेळी खासदार रामदास तडस यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या. उपस्थित नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.
आरटीओचा अहवाल
चालकाने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे भीषण बस अपघाताचे टायर फुटणे हे कारण नव्हते. अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) बसचा टायर फुटल्याने किंवा अतिवेगाने पलटी झाल्याची शक्यता नाकारली आहे. आरटीओचे म्हणणे आहे की घटनास्थळी रबराचे तुकडे किंवा टायरच्या खुणा आढळल्या नाहीत. घटनेचे आघात चिन्ह चाकाच्या डिस्कवर होते, जे वाकले होते.
अपघातात वाचलेल्यांशी बोलून आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तयार करण्यात आलेल्या अहवालात आरटीओने ही माहिती दिली आहे. वृत्तानुसार, एका वाचलेल्या प्रवाशाने सांगितले की, बस रस्त्याच्या उजव्या बाजूला एका स्टीलच्या खांबाला धडकली, त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले, त्यानंतर बस दुभाजकाला धडकली आणि उलटली. बसचा वेग फारसा जास्त नसावा, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हे सुद्धा एक कारण
परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “बस चालकाचे लक्ष विचलित झाल्याने अपघाताचे कारण असू शकते, त्यामुळे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस खांबाला आदळून उलटली.” बस मालक वीरेंद्र दारणा याने सांगितले की त्यांनी ही बस २०२० मध्ये खरेदी केली होती. त्याचा चालक डॅनिश अनुभवी ड्रायव्हर आहे. त्याच वेळी, सूत्रांनी सांगितले की बसची नोंदणी २४ जानेवारी २०२० रोजी झाली होती. त्याचे फिटनेस प्रमाणपत्र १० मार्च २०२४ पर्यंत वैध होते.