बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात होऊन २६ प्रवाश्यांचा समृद्धी महामार्गावर होरपळून मृत्यू झाला. गेल्या अनेक वर्षांमधील हा सर्वांत भीषण अपघात मानला जातो. अनेक कुटुंब रस्त्यावर आले, अनेकांचे तर कुटुंबच उध्वस्त झाले. तर काहींच्या कुटुंबातील तरुण पिढी यात होरपळली. या बसने पेट घेण्याचे कारण आता पुढे आले असून त्यासंदर्भातील अहवालही सादर करण्यात आला आहे.
फॉरेन्सिक फायर अँड सायबर इन्वेस्टीगेटर्स या मुंबईच्या संस्थेने बस अपघाताच्या संदर्भातील सविस्तर अहवाल बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. या अहवालात अपघातापूर्वी बसची स्थिती आणि त्यानंतर पेट घेण्यापर्यंतचा संपूर्ण क्रम नमूद करण्यात आला आहे. विदर्भ ट्रॅव्हलच्या या बसने पेट घेतल्यामुळे मृतदेहांची ओळख पटविणे सुद्धा प्रशासनाला अत्यंत अवघड गेले होते, एवढा हा भीषण अपघात होता. फॉरेन्सिक रिपोर्ट नुसार हा अपघात मध्यरात्रीनंतर १ वाजून ३२ मिनीटांच्या सुमारास झाला आणि बस ७० ते ८० किलोमीटर प्रती तासाने धावत होती.
संपूर्ण अपघात एखाद्या चित्रपटातील भयंकर प्रसंगाप्रमाणे घडल्याचे या अहवालातील माहितीवरून कळते. बसचे समोरचे चाक एका साईन बोर्डला धडकले आणि त्यानंतर सगळे घडत गेले. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अपघात झाला तेव्हा बस पहिल्या लेनमध्ये म्हणजे ओव्हरटेकिंग लेनमध्ये धावत होती, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
समोरचे चाक धडकले आणि…
बसचे समोरचे चाक सुरुवातीला रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईन बोर्डला धडकले. त्यानंतर पुन्हा दहा फूट अंतरावर असलेल्या आरसीसी काँक्रीटच्या दुभाजकालाही धडकले. याच दुभाजकाला बसचे पाठीमागचे चाकही धडकले आणि त्यामुळे बस एका दिशेने झुकली. ही धडक एवढी भीषण होती की मागील टायर फुटला आणि टायरच्या आतील लोखंडी रिंग मोडली. त्यांतर बस काही अंतरावर जाऊन डाव्या बाजूला रस्त्यावर उलटली. त्यामुळे बसचा मुख्य दरवाजा खालच्या बाजूला दबला.
३५० लिटर डिझेल उडाले
बस उलटल्यानंतर समोरचा एक्सेल बसपासून तुटून वेगळा झाला आणि तोच एक्सेल जाऊन डिझेल टॅंकवर आढळला. बसमध्ये त्यावेळी ३५० लिटर डिझेल होते आणि या धडकीमुळे संपूर्ण डिझेल सर्वत्र उडाले. हे डिझेल बसच्या इंजिनच्या हॉट एक्झॉस्टच्या संपर्कात आले आणि त्यामुळे बसने पेट घेतला, असे फॉरेन्सिक अहवाल म्हणतो.