नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बसचा महाभीषण अपघात झाला आहे. आगीने पेटलेल्या या बस अपघातात तब्बल २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्याची तत्काळ दखल मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घोषणा केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या अपघाताविषयी माहिती मिळाली. महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेने अतिशय दु:ख झाले. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझे विचार आणि प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहेत. बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) कडून २ लाखांची मदत दिली जाणार आहे. तर, जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, असे मोदी यांनी जाहीर केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. दुर्घटनेची माहिती कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.