बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समृद्धी महामार्गावरील भीषण बस अपघातातून वाचलेल्या प्रवाशाने त्यांचा थरारक अनुभव सांगितला आहे. अक्षरशः अंगावर काटा यावा, असाच प्रकार त्यांनी अनुभवला आहे. सर्व शक्ती पणाला लावत त्यांनी स्वतःचा जीव वाचविला आहे. एका प्रवाशाने सांगितले की, तो आणि इतर काही जण बसची मागील खिडकी तोडून बाहेर आले, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. रात्रीच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात संपूर्ण बस पेटली. त्यात २६ प्रवासी जिवंत जळून खाक झाले. नागपूर-पुणे दरम्यान समृद्धी महामार्गावर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
या अपघातातून बचावलेल्या एका प्रवाशाने सांगितले की, ‘बसचा टायर फुटला होता आणि अपघात होताच बसने पेट घेतला. अवघ्या काही मिनिटांतच आगीने संपूर्ण बस जळून खाक झाली. मी आणि माझ्यासोबत बसलेला दुसरा प्रवासी कसातरी बसची मागील खिडकी तोडून बाहेर पडलो. अपघातातून बचावलेल्या व्यक्तीने सांगितले की, ‘पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या होत्या. एका स्थानिक व्यक्तीने सांगितले की, अपघातानंतर ४-५ जण जळत्या बसमधून बाहेर पडू शकले पण बाकीचे बाहेर पडू शकले नाहीत.
प्रवासी जिवंत जळताना पाहिले
या अपघातातून बचावलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, तो बसमधून बाहेर पडला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना मदतीची याचना केली. पण कोणीही त्यांचे वाहन थांबवले नाही. एका स्थानिकाने सांगितले की, ‘पिंपळखुटा या मार्गावर अनेक अपघात होतात. आम्हाला मदतीसाठी हाक मारण्यात आल्यावर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. पण येथील दृश्य भयानक होते. बसमधील लोक खिडकी तोडण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही लोकांना जिवंत जळताना पाहिलं… आग इतकी भीषण होती की आम्ही काहीच करू शकत नव्हतो. आम्ही रडत होतो.
…तर प्राण वाचले असते
महामार्गावरून जाणारी वाहने थांबली असती तर अनेकांचे प्राण वाचू शकले असते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातात जखमी झालेल्या आठ जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये ३३ जण प्रवास करत होते, त्यापैकी २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बस डावीकडे उलटली, त्यामुळे तिचा दरवाजा खाली आला आणि बसमधील प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर पसरले, त्यामुळे बसने पेट घेतला.